जिल्ह्यात अतिवृष्टी, जनजीवन प्रभावित

By Admin | Updated: July 22, 2014 23:51 IST2014-07-22T23:51:08+5:302014-07-22T23:51:08+5:30

मागील दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सातही

Due to heavy rain, life-threatening influenced district | जिल्ह्यात अतिवृष्टी, जनजीवन प्रभावित

जिल्ह्यात अतिवृष्टी, जनजीवन प्रभावित

गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले : पुरात वृद्धाचा मृत्यू, वैनगंगा नदीचा जलस्तर वाढला, शाळकरी विद्यार्थ्यांना फटका
भंडारा : मागील दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहे. गोसेखुर्द धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात मागील ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळे या धरणाचे सर्वच ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.
वैनगंगेचा जलस्तर वाढला
भंडारा : शहरासह तालुक्यात पावसामुळे जनजीवन विसकळीत झाले असून पावसामुळे वर्दळ कमी झाली होती. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. भंडाऱ्यात मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकांना फटका बसला आहे. वैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. गोंदिया जिल्ह्यातील व मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढत आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे रोवणीसाठी हा पाऊस पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, भंडारा तालुक्यात ७६.५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नवजीवन कॉलनीत पाणी
साकोली : जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात बरसला असून धान रोवणी जोमात सुरू झाली आहे. चुलबंद नदी, नाल्यासह तलाव तुडूंब भरले आहे. २४ तासात तालुक्यात १०५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षीच्या मान्सून सत्रात सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात बरसला आहे. येथे काही प्रमाणात सोयाबीन पिकाला फटका बसला असला तरी दुबार पेरणीनंतर आलेल्या पऱ्ह्यांची रोवणी सुरू आहे. संततधार पावसामुळे कोसमतोंडी, नागझिरा, पळसगाव मार्ग बंद झाले आहेत. शहरातील नवजीवन कॉलनीत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. भाजीपाला विक्रीची दुकाने बंद होती. विर्शी येथील पुलावर पाणी वाढल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.
चौंडेश्वरी पुलावर पाणी
मोहाडी : विहीरगाव - टांगा नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना भैय्याजी झिंगर तिजारे रा.टांगा या ६५ वर्षीय वृद्धाचा पाण्यात तोल गेल्यामुळे वाहून गेला. तालुक्यातील पाच मार्ग बंद झाले असून तालुक्यात ७६.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मोहाडी ते कुशारी, दहेगाव ते रोहणा, मोहाडी ते मांडेसर, महालगाव ते मोरगाव व आंधळगाव - वडेगाव, चौंडेश्वरी मंदिरासमोर मार्गावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मोहाडी बसस्थानकासमोर पाणी साचल्यामुळे लहान वाहनांना रहदारीसाठी अडथळा निर्माण होत आहे. सूर नदीच्या पुलावर पाणी यायला चार फुटाचे अंतर शिल्लक असून अतिवृष्टीमुळे मोहाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. दरम्यान मोहाडी तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या आपत्ती निवारण कार्यालयात तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून माहिती मिळत नसल्याची ओरड आहे. सर्व तलाठ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात राहण्याचे आदेश असतानाही सालई येथील तलाठी कर्तव्यावर नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामीण भागात चिखल
तुमसर : तालुक्यासह आंतरराज्यीय सीमेवर मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. मागील २४ तासात ५७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे तुमसर शहरात शुकशुकाट होता. ग्रामीण भागात चिखल झाल्यामुळे रहदारीसाठी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
घरांची अंशत: पडझड
लाखनी : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लाखनीतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. तालुक्यात २४ तासात ९७.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील कोणताही मार्ग बंद नाही. आज ७४.२ मि.मी. पाऊस झाला. पालांदूर मध्ये ७८.४ मि.मी., पोहरा ५५.३, पिंपळगाव सडक ६५.७, मात्र पावसामुळे धान रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मोरगाव, सालेभाटा, दहेगाव, लाखनी येथे घरांची अंशत: पडझड झाली आहे. दरम्यान लाखनी-पालांदूर मार्गावरील काही झाडे उन्मळून पडल्याने हा मार्ग काही काळ बंद होता. अतिवृष्टीमुळे लाखनी येथील आठवडी बाजार भरला नाही.
जलमय परिसर
पवनी : जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे पवनी तालुक्यात सोयाबीन पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. पवनी तालुक्यात ७६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
आवळीवासीय संकटात
लाखांदूर : चुलबंद नदीचे पात्र असलेल्या लाखांदूर तालुक्यात २४ तासात ८०.२ मि.मी. पाऊस बरसला. सखल भागात पाणी शिरल्याने ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. तलाव बोडी पाण्याने तुडूंब भरली असून चौरास पट्यातील धान रोवणीला जोमात सुरुवात झाली आहे. आवळी, राजनी, ओपारा या परिसरात पाण्यामुळे ग्रामस्थांना दरवर्षी संकटाचा सामना करावा लागतो. नेहमीप्रमाणे याहीवर्षी शासकीय मदत व विकासाची कामे रखडली असल्याने हाही पावसाळा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
धरणाचे दरवाजे उघडले
गोसेबुज : गोसेखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये धरणाचे पाणी शिरू नये, याकरिता सर्व ३३ दरवाजे अर्धा उघडण्यात आलेले असून १,०५,००० घनमीटर पाण्याचा प्रति सेंकद वेगाने विसर्ग सुरू आहे. २३८.८०० मीटरवर धरणाचा जलस्तर स्थिर ठेऊन धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणात येणारा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)

Web Title: Due to heavy rain, life-threatening influenced district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.