कोरड्या दुष्काळाने होरपळले शेतकरी
By Admin | Updated: November 16, 2014 22:45 IST2014-11-16T22:45:03+5:302014-11-16T22:45:03+5:30
मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला.

कोरड्या दुष्काळाने होरपळले शेतकरी
शेतकऱ्यांवर संकट : लोकप्रतिनिधींची चुप्पी संतापजनक
युवराज गोमासे - करडी (पालोरा)
मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला. रिसाळा मायरनरचे पाणी न मिळाल्याने करडी शेतशिवारात तर स्थिती भयावह आहे. हजारो एकर शेतात दुष्काळाच्या भेगाच दृष्टीस पडत आहेत.
करडी परिसरातील शेती जुगार ठरली आहे. बिनभरवशाच्या पावसावर येथील शेती कसली जात आहे. कधी ओल्या तर बऱ्याचवेळा कोरड्या दुष्काळाचा भार येथील शेतकरी भोगत असतो. नशिबाचा भोग मानणाऱ्यांचे दु:ख समजू शकतो. मात्र मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे दु:ख पचवायला त्रास होत आहे. संपूर्ण करडी परिसर वैनगंगा नदीच्या पूर्वेकडे कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेला आहे. मात्र निसर्गाची अवकृपाच सदैव येथे पाहावयास मिळते. खोरा सुपिक जमिनीचा पोत असलेला असला तरी येथील विहिरींमध्ये पाण्याची मात्रा कमजोर आहे. लहान मोठे तलाव मोठ्या प्रमाणात असले तरी पाणी साठविण्याची क्षमता अगदी नगण्य आहे. तलाव उपसा करून पुनर्जीवन व खोलीकरण करण्यासंबंधीची मागणी अनेकदा होत असली तरी शासन प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेती व जंगलावर आधारित व्यवसाय परिसरातील लोकांच्या उपजिवीकेचे साधन आहे. कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा अभयारण्याने संपूर्ण जंगल ताब्यात घेतले. जंगलात जाण्याची मनाई असल्याने लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
नुकसानीचे सर्व्हेक्षण व मदत मिळाली पाहिजे
करडी परिसरात कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे, शेतीचे कंबरडे मोडले आहे. रिसाळा मायनरचे पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोहचले नाही. त्यांच्या निष्काळजीपणाची, गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. परिसरातील सिंचनासाठी तलावाचे यांत्रीकी पद्धतीने खोलीकरण करून धापेवाडा उपसा सिंचन योजना तसेच सुरेवाडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सिंचनाचे जाळे परिसरात शासन व प्रशासनाने निर्माण करावे. कोरड्या दुष्काळाचे सर्व्हेक्षण करून तात्काळ मदत देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश इलमे यांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण करडी परिसरावर दुष्काळाचे डोंगर उभे झाले आहे. मेहनतीने कसलेली शेती कवडीमोल ठरली. पोळ्याच्या सणानंतर पाऊस न पडल्याने हलका धान कमजोर पडला. भारी धान तर उभा वाळला. ऐकेकाळी शेतकऱ्यांच्या ५ ते १० एकर शेतात बिजाईला सुद्धा धान जमिनीतून कोठारात आले नाही. जमिनीला भेगा पडल्या तशा शेतकऱ्यांच्या काळजाला सुद्धा चरा पडल्या. होत्याचे नव्हते झाले. धान पेरणी, रोवणी व कापणीचा खर्चाबरोचर खत व इंजीनने पाणी दिलेला खर्चही बोकांड्यावर बसला. उत्पन्न होण्याऐवजी कर्जाचा डोंगर माथ्यावर उभा झाला.