गोसेखुर्द परिसरात दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: June 30, 2017 00:29 IST2017-06-30T00:29:53+5:302017-06-30T00:29:53+5:30
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल,

गोसेखुर्द परिसरात दुष्काळाचे सावट
मूलभूत सुविधांचा अभाव : पर्जन्यमान घटले, निसर्गाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ: महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल, असे भाकीत अनेक नेत्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले होते. त्यादृष्टीने गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतु तीन- चार वर्षांपासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील गोसे, चिचाळ, पाथरी, सौंदळ, आकोट, वासेळा आदी गावात दुष्काळदृष्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
गोसेखुर्द प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून जल साठवणीला पाच वर्षापासून प्रारंभ झाला. त्याचा फायदा गोसे खुर्द प्रकल्पाच्या २५ किलोमिटर अंतरावरील शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून शेतकऱ्यांची उन्नती झाली आहे. पण गोसे खुर्द प्रकल्पाला लागून असलेल्या १० किमी परिसरात तिन ते चार वर्षापासून सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती पिकत नाही. गोसे, चिचाळ येथे योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे तसेच राहुन रोवणी होऊ शकली नाही.गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठवणे सुरु झाले. आणि या परिसरातील समस्यांना सुरुवात झालेली आहे. वैनगंगा नदीला नागपूरचे नागनदीचे अतिशय घाणरडे पाणी येवून मिळत असल्याने प्रकल्पातील पाणी दुषीत झाले असुन दुर्गंधी युक्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. यामुळे भविष्यात अनेक रोगांना सामोरे जावे लागु शकते. तरी यावर संबंधितांनी कोणती तरी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. सदर प्रकरणी काही भूगोल तज्ञाशी चर्चा केली असता धरण क्षेत्रात बाष्पीभवन होत असल्याने दमट वातावरण निर्माण होवून त्या भागात ढग निर्माण होतात. परंतु हे ढग दुसरीकडे वाऱ्यामार्फत वाहुन नेले जातात. त्यामुळे सदर परिसरात अत्यअल्प पाऊस पडून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. मात्र याचा फटका गेल्या चार वर्षापासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील लोकांना बसत आहे. सदर परिसरातील समस्या क्षेत्रातील पुढाऱ्यांनी शासन दरबारी मांडून शासनाच्या लक्षात आणून द्यावे, अशी मागणी गोसेखुर्द परिसरातील जनतेनी केली आहे.