अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडला
By Admin | Updated: March 6, 2016 00:19 IST2016-03-06T00:19:27+5:302016-03-06T00:19:27+5:30
मागील पाच दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडला
कृषी विभाग म्हणतो, नुकसान नाही
रबी व भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
भंडारा : मागील पाच दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आधीच नापिकीने हवालदिल झालेला शेतकरी अवकाळी पावसाने पुरता हतबल झाला आहे.
शासन-प्रशासनातील दुरावा चव्हाट्यावर
भंडारा : कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, भंडारा जिल्ह्यात नुकसान नाही, तर खासदार पटोले नुकसान भरपाई कोणत्या अहवालावरुन मागतात, असा प्रश्न निर्माण होतो. दोन दिवस वादळी पावसामुळे नुकसान झालेले आहे, यात दुमत नाही. नुकसान झालेल्या पिकाचे सर्वेक्षण करुन पंचनामे तयार करण्याचे निर्देश लोकप्रतिनिधींनी कृषी खात्याला देणे गरजेचे होते. मात्र लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण कृषी खात्याने केले असल्याचे गृहीत धरुन केलेली आर्थिक मदतीची मागणी न पटणारी आहे.
खासदार नाना पटोले यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली आहे. खासदार पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निवेदनात, महाराष्ट्रात आधीच पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. २९ फेब्रुवारी रोजी भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह महाराष्ट्रात गारपीटीमुळे शेतीत उभ्या रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपीटीसह मुसळधार पाऊस व वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले रबीचे पिकही वाया गेले आहे. शेतीतील तोट्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक संकटाने आणखी भर टाकली आहे. निसर्गाच्या तांडवामुळे शेतकऱ्यांची शेती, जनावरे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यां समोरील या भीषण संकटात त्यांना तत्काळ आर्थिक मदतीची गरज असल्याचे नमूद आहे.
भाजीपालावर्गीय पिकाचे नुकसान
पवनी : वातावरण बदलाचे संकेत म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. एकाच दिवसाच तिन्ही ऋतू लोकांना अनुभवायला मिळत आहेत. पहाटेच्या सुमारास हिवाळा असल्याची जाणीव होत आहे. दिवसभर ऊन तापल्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव तर सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होवून पाऊस देखील पडत असल्याने पावसाळा असल्याचे भासत असल्याने शेतकऱ्यांना हंगामात पिक कोणते घ्यावे याचा अंदाज कळेनासा झाला आहे.
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात निसर्गाची अवकृपा झाली. ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा बहर नाहीसा झाला. शेतात भाजीपाला पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी कोबी, वांगी, गवार, चवळी, टमाटर, मेथी, पालक असे पीक लावलेले आहेत. ढगाळ वातावरण व अवेळी आलेल्या पावसाने भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या आपत्ती निवारण कक्ष तसेच कृषी विभागाकडे झालेल्या नुकसानीची आकडेवारी नाही त्यामुळे नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे त्यांनीच सहन करावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रबी पिकांचे नुकसान
आसगाव : चार दिवसापुर्वी चौरास भागात आलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले. सतत दोन दिवस चौरास भागावर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. शेतकरी कुटूंबातील प्रत्येक जीव रब्बी पिकांच्या कळपा आणि ढगांवर ताळपत्री झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. हाती येणारे थोडेफार पिक सुव्यवस्थीत मळणी झाली असती तर त्या धान्याला योग्य तो बाजारभाव मिळाला असता मात्र कळप व ढगांवर पाणी गेल्याने धान्याचा दर्जा घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावी लागणार आहे. वाटाणा हे खराब होणारे धान्य असल्याने ते काळपट पडू लागले तर गहू पिकावर पाणी गेल्याने पोळी खाताना चवदार किंवा रूचकर लागणार नाही. वातावरणातील बदलामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे दिवाळे निघत आहेत. मार्च अखेर प्रत्येक शेतकऱ्यांना पिककर्ज भरावे लागत असल्याने कर्ज कसे फेडावे अशा विवंचनेत शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
निसर्गाचा लहरीपणा शेतकरी संकटात
लाखांदूर : यावर्षी धान पिकाने शेतकऱ्यांना चांगलेच संकटात टाकले. अनेक शेतकऱ्यांना एकरी पाचदहा होते धानाचे उत्पादन झाले. ज्यांच्याकडे पाण्याची थोडीफार सोय होती. त्यांना कसेबसे धान झाले. मात्र अशा परिस्थितीत धान उत्पादकांना त्यांनी शेतीत केलेला खर्चही निघाला नाही. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी शेतीत वाट्टेल त्या किंमतीत गहू, चना, मूग, उळीद, सोयाबीन, जवस, अनेक वर्गीय पिके महागडी बजायत घेवून शेतीत लावली. संपूर्ण हिवाळाभर मात्र निसर्गाचा पावसाचा एक थेंबही शेतात पडला नाही. मात्र थोडीफार रब्बी पिके शेतकऱ्याच्या बिजायत खर्च निघेल अशी आशा असताना मात्र निसर्गाने गेल्या आठ दिवसापासून अकाली पावसाचा तडाखा शेतकरी झेलत आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पिकांची फार मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जनावराचा चारा काळा पडत आहे. रबी पिकाचा रंग सुद्धा खराब होत आहे. शेतकरी अकाली पावसामुळे दुहेरी चक्रव्यूहात सापडलेला आहे.
रबी पिकाचे अतोनात नुकसान
पालोरा (चौ.) : मागील आठवड्यापासून पालोरा परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. तोंडाजवळील घास हरविल्याप्रमाणे रब्बी पिकाची हानी झाली आहे. गहू, वटाना, तुरी हरबरा जमीनदोस्त झाला आहे. मार्च महिन्यापुर्वी बँक सोसायट्याचे कर्ज भरावे लागते. आता कर्जाची परतफेड कशी करावी या प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
पवनी तालुक्यातील पालोरा हा भाग चौरास भाग म्हणून प्रसिद्ध आहे. सध्याला सर्वत्र उन्हाळी धान पिकाची रोवणी सुरू आहे. वाटाना, मुग, गहू, हरबरा पिकाची कटाई सुरू आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने कटाई सुरू आहे. एकाएकी वादळासह पाऊस आल्याने शेतातील पिक ओले होवून दाना जमीनीवर पडला आहे. संपूर्ण रबी पिकाची नासाडी झाली होती. काल दिवसभर पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. दिवसभर मजुरवर्ग रबी पिक गोळा करीत असताना सायंकाळी ५ वाजतासह वादळी पावसाचे जोरदार आगमन झाले. ताडपत्री टाकायला शेतकऱ्यांना वेळ मिळाली नाही. परिणामी रबी पिक मातीमोल झाले आहे. शेतातील राज्य मार्गावरील मोठ मोठे वृक्ष कोलमडले आहे.
पावसामुळे पिकांना फटका बसला की नाही, याची माहिती ग्रामस्तरावर तलाठी व ग्रामसेवक गोळा करीत असतात. तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात सादर केला जातो. नुकसानी विषयी माहिती गोळा करण्याचे काम आमच्याकडे नाही.
- शंकर किरवे,
जिल्हा कृषी अधिकारी, भंडारा.
भंडारा जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील अवर्षणास सामोरे जात असतानाच रब्बी हंगामातील गहू व इतर पीक कापणीचे स्थितीत असलेला गहू, हरभरा, जवस, मोहरी, लाखोळी पिक अनेक ठिकाणी जमिनदोस्त झाला. यामुळे शेतकरी डबघाईस आला असून शासनाने गंभीर दखल घेऊन महसूल व कृषी विभागामार्फत झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
- नरेश डहारे,
कृषी सभापती जि.प. भंडारा.
निष्टी, भुयार, आमगाव परिसरात सायंकाळी गारांसह पाऊस झाला. चना, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डाळवर्गीय पिकांचे बियाणे महाग असते. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाई म्हणून बियाणे द्यावे.
- मोहम्मद अशपाक पटेल, शेतकरी, निष्टी ता. पवनी.