पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: August 30, 2016 00:18 IST2016-08-30T00:18:24+5:302016-08-30T00:18:24+5:30

बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा सण म्हणजे पोळा.

Due to drought | पोळा सणावर दुष्काळाचे सावट

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

शेतकरी संकटात : पोळा येऊनही रोवणीची कामे अपूर्णच
मासळ : बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा सण म्हणजे पोळा. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी पडणारा दुष्काळ व यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने, पिकांची गंभीर अवस्था या व इतर कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आवडत्या सणावर दुष्काळाचे सावट पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आला आहे. यावर्षी सुध्दा सुरुवातीच्या पावसाच्या विलंबनानंतर, रोवणी उशिरा झाली. बऱ्याच ठिकाणी अर्धवट झाली. तलाव, बोळ्या नाले, आतापासूनच कोरडे व्हायला लागले. त्यामुळे शेतकऱ्यांवर यावर्षी सुध्दा अस्मानी संकट कोसळण्याचे दाट चिन्हे दिसून येत आहेत. नागपंचमीपासूनच पावसाने दडी मारल्याने उर्वरित दिवसात काय होईल याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अपुरा पाऊस, पिकांची गंभीर अवस्था, भारनियमन या साऱ्या बाबींमुळे पिकांवर विपरीत परिणाम होवून उत्पादनात निश्चीतच घट होणार आहे. भाजीपाला, खाद्यपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ यामुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. गावापासून तर शहरापर्यंत बाजारपेठा पोळा सणानिमित्त सजावटीच्या साजांनी सजलेल्या आहेत. बैलांना सजवण्याकरिता लागणारे साहित्याच्या किंमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. शेतकऱ्यांकडे सजावटीच्या सामान खरेदीसाठी पैसा नाही, वर्षानुवर्षाच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी त्या दुकानाकडे पाठ फिरविली आहे. बाजारात उत्साह, चैतन्य नाही. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा होणारा पोळा सण यावर्षी मात्र काटकसरीने खर्च करुन साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे.पूर्वी जन्माष्टमीपासूनच शेतकरी आठवडी बाजारातून किंवा अन्य ठिकाणाहून बैलांच्या साजांचा सामान खरेदी करायचे. परंतु पिक पाणी बरोबर नसल्याने, दुष्काळी स्थितीची चाहुल लागल्याने शेतकऱ्यांनी हात आवरल्याचे दिसते. शेतकऱ्यांना आकर्षीत करण्यासाठी दुकानदारांनी, बैलांना सजवण्यासाठी लागणारी झुली, घुंगराच्या माळा, कवडीच्या माळा, बाशिंगे, कासरा खंड, कानोऱ्या गोंदे, भटाक्ष्या, बेगड, गेरु, विविध रंग, वेसणी, दावे, दोर मोहक इत्यादी विविध डिझाईनमध्ये आधुनिकतेचा वापर करुन विक्रीसाठी ठेवलेली आहेत. परंतु दुष्काळापायी दुकानदार, ग्राहक शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. दुष्काळी स्थिती व दिवसागणीक घटणारी, बैलजोडीची संख्या यामुळे सुध्दा दुकानदारांना अच्छे दिनची शक्यता कमी झाली आहे. भविष्यात बैलांचा साज विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागेल अशी प्रतिक्रीया दुकानदाराने व्यक्त केली. (वार्ताहर)

असे आहेत दर
सध्या मटाटा ४० ते ५० रूपये झुलीचा जोड ३५० ते ५५०, बेसण ३० ते ३५ रुपये, कासरा १००-२००, दावा ४०-५०, कानोरी १५ रुपये, शेरु १० रुपये, रंगडब्बी ५ रुपये अशा चढत्या भावात उपलब्ध आहेत. काही शेतकरी रंगाचे निव्वळ ढिपके मारुन बैलाना पोळ्यात नेऊन बैल सजवतात. इच्छा असतांना सुध्दा वर्षभर राबणाऱ्या आपल्या बैलाना तरुण राज्याच्या अवकृपेने व दुष्काळाने सजवतो घेत नाही व प्रम व्यक्त होत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.

Web Title: Due to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.