जलस्त्रोत रिकामेच असल्याने दुष्काळसदृश स्थिती
By Admin | Updated: August 13, 2014 23:39 IST2014-08-13T23:39:36+5:302014-08-13T23:39:36+5:30
यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची पाळी आली. पावसाचे नक्षत्र हळूहळू निघून जात आहेत. सासरा परिसरात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अल्प आहे.

जलस्त्रोत रिकामेच असल्याने दुष्काळसदृश स्थिती
सासरा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची पाळी आली. पावसाचे नक्षत्र हळूहळू निघून जात आहेत. सासरा परिसरात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अल्प आहे. नुकत्याच आलेल्या पावसाने रोवणे कसेबसे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या लहरीपणावर उपाय नसल्याने येथील शेतकरी वर्ग भविष्यातील समस्यांनी चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे.
सासरा व परिसरातील जलसंचय करणाऱ्या तलाव /बोड्या अद्यापही तहानलेल्याच आहे. धान पिकाच्या सुगीच्या काळापर्यंत सिंचन व्यवस्था होईल असे दिसून येत नाही. पावसाच्या अल्प प्रमाणाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. सासरा व परिसर ग्रामीण भाग असल्याने या भागातील बहुतांश नागरिक शेतीवर निर्भर आहेत.
गतवर्षी अतिवृष्टी तर यावर्षी अवर्षण अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोवणी झालेल्या धान पिकाला जगविण्यासाठी थोडा फार पाऊस येत आहे.
पण वातावरणातील तापमानही धानपिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. पेरणी पासून रोवणीपर्यंत आधीच जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना धानपिकाला जगविण्यासाठी महागड्या औषधी वापरावी लागणार आहे.
ज्यांच्यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे त्या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्राणपणाने लढावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणाच्या समस्यांनी शेतकरी व्यथीत झाल्याचे दिसून येत आहे. जगाच्या पोशिंद्याच्या नशीबी केव्हा अच्छे दिन येतील हे न उलगडणारे कोडे आहे. उदरनिर्वाह, मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे वैवाहिक प्रश्न, कर्जाची परतफेड इत्यादी समस्या शेतकऱ्यांची झोप उडवत आहेत.
अल्प पर्जन्यवृष्टीने धान पिकाला जगविण्यासाठी फारच जिकिरीचे होणार असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचा उर्वरित कालावधी कमी असल्याने जलसाठे रिकामेच राहण्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)