मतभेदामुळे आवारभिंतीचे काम रखडले
By Admin | Updated: June 28, 2015 00:49 IST2015-06-28T00:49:14+5:302015-06-28T00:49:14+5:30
कोंढा येथे ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांच्यात अंतर्गत भांडणे असल्याने विकास कामे ठप्प आहेत.

मतभेदामुळे आवारभिंतीचे काम रखडले
कोंढा-कोसरा : कोंढा येथे ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांच्यात अंतर्गत भांडणे असल्याने विकास कामे ठप्प आहेत. अंगणवाडी क्र. दोन ला आवारभिंत कामासाठी तीन वर्षांपासून निधी प्राप्त होऊन देखील अंतर्गत मतभेदामुळे ते काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही.
ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच हे आधी एकाच गटाचे होते. पण सध्या दोघांचे दोन गट निर्माण झाले आहे. सरपंच शीला कुर्झेकर यांच्या बाजूने तीन सदस्य तर उपसरपंच गौतम टेंभुर्णे यांच्या बाजूने सहा सदस्य आहेत. कोंढा येथे वार्ड क्र. दोनमध्ये आठवडी बाजार भरत असलेल्या जागेला लागून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडी क्र. दोन आहे. या अंगणवाडीच्या कूपनलिका व आवारभिंत बांधकामासाठी लाखो रुपयाचा निधी मंजूर झाला. या आवारभिंतीच्या बांधकामावरुन सरपंच व उपसरपंच यांच्या गटात तिव्र मतभेद समोर आले आहे. उपसरपंच व त्यांच्या गटाचे मत आहे की, आवारभिंतीचे बांधकाम करताना तेथून कोणाचाही येण्याजाण्याचा मार्ग नसल्याने रस्ता सोडण्यात येऊ नये. तर सरपंच शीला कुर्झेकर व त्यांच्या गटाचे म्हणणे आहे की, आवारभिंतीचे बांधकाम प्राथमिक उपकेंद्र व अंगणवाडी दरम्यान मागील घरांना येण्याजाण्यासाठी रस्ता सोडण्यात यावे. यावरुन सध्या आवारभिंतीचे बांधकाम मुखळण बिलवणे यांनी बंद पाडले. त्यांना येण्याजाण्यास रस्ता पाहिजे आहे. या वादामुळे तीन वर्षांपासून हे काम बंद आहे.
ग्रामपंचायत मासिक सभा ७ डिसेंबर २०१२ च्या सभेत रस्ता सोडण्यात येऊ नये असा ठराव आठ विरुध्द तीन असा ठराव झाला त्यानुसार बांधकाम करावे, अशी उपसरपंच व अन्य सहा ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे. २९ जानेवारी २०१५ ला देखील हा विषय मासिक सभेत उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग, पवनी यांच्या पत्रानुसार घेण्यात आले त्यांनी तीन वर्षापासून आवारभिंतीचे काम बंद असल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी आवारभिंतीचे काम कोठून करावे याची माहिती नकाशा व ठराव देण्यात यावे असे कळविले होते.
यावेळी मासिक सभेत सरपंच तसेच सदस्य अमित जिभकाटे व शिला जिभकाटे यांनी आवारभिंतीचे काम करताना मागील घरवाल्यांना जाण्यायेण्याकरिता दोन फूट जागा सोडून काम करावे पण उपसरपंच गौतम टेंभूर्णे व पाच सदस्य जागा सोडण्यात येऊ नये, या मताचे असल्याने जागा न सोडण्याचा ठराव सहा विरुध्द तीन मताने पारित झाला. अशाप्रकारे तीन वर्षापासून हे काम अंतर्गत मतभेदातून बंद आहे. उपसरपंच व सरपंच यांच्यात सध्या अंतर्गत मतभेद असल्याने कामे पूर्ण होण्यास अडचण जात आहे. (वार्ताहर)
अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्र या दरम्यान मागील घरवाल्यांना जाण्यासाठी दोन फुट तरी जागा ठेवून काम करावे.
- शीला कुर्झेकर, सरपंच
ग्रामपंचायत मासिक सभेत ७ डिसेंबर २०१२ ला ठराव झाला. त्याप्रमाणे काम करावे. रस्ता सोडल्यास आरोग्य केंद्र व अंगणवाडी यांना धोका निर्माण होऊ शकते. खाली जागेत दुर्गंधी वाढू शकते.
- गौतम टेंभुर्णे, उपसरपंच
ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व सदस्य कामाच्या जागेवर उभे राहिल्यास काम करण्यास तयार आहोत.
- प्रकाश कुर्झेकर, कंत्राटदार