संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: August 5, 2014 23:19 IST2014-08-05T23:19:40+5:302014-08-05T23:19:40+5:30
मागील २४ तासापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. संततधार सुरु असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे रोवणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत.

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत
ढगफुटीची भीती : जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी घोषित
ंभंडारा : मागील २४ तासापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. संततधार सुरु असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे रोवणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत. हवामान खात्याने ढगफुटीची शक्यता वर्तविल्याने आज दुपारनंतर जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
श्रावण मासारंभाच्या सुरुवातीला पावसाने सुमारे चार दिवस मुसळधार हजेरी लावली होती. त्यानंतर आठवडा कोरडा गेला. मागील २४ तासापासून सुरु असलेल्या या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून मागील आठवड्याच्या सध्याचा पाऊस कमी आहे.
मागील आठवड्यात झालेल्या पावसाने अनेक जणांचे जीवन उध्वस्त झाले होते. जिल्ह्यातील सिंदपुरी येथील तलावाची पाळ फुटल्याने गावातील शेकडो नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा संततधार सुरुवात झाली. सोमवारला दिवसभर हा पाऊस सुरु होता. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने शासकीय कार्यालय व शाळा महाविद्यालयात या पावसामुळे विद्यार्थी व शासकीय कामे करण्याकरिता येणाऱ्या नागरिकांची संख्या नगण्यच दिसून आली. मंगळवारी सतत पाऊस सुरु आहे. अशातच हवामान खात्याचे ढगफुटीची शक्यता वर्तविली आहे.
२४ तासापासून सुरु असलेला पावसाने खोळंबलेली रोवणीची कामे झपाट्यात पूर्णत्वास येत आहेत. सुरुवातीला पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर सुरु झालेल्या रोवण्यांना मजूरवर्गांना अत्यल्प रोजी देण्यात येत होती .मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने मजूरवर्गांच्या रोजीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील ७५ टक्केपेक्षा जास्त रोवण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात साकोलीत अतिवृष्टी झाली असून त्यानंतर तुमसर, लाखांदूरचा क्रमांक लागतो. संततधार सुरु असलेल्या पावसात साकोलीत ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून तुमसर येथे ६० मि.मी. तर भंडारा तालुक्यात २०.५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील पावसाचा आकडा ३२.३८ मि.मी. वर असून त्याची सरासरी ८२.२३ टक्क्यावर पोहचली आहे. १ जून ते ५ आॅगस्ट पर्यंत ७०५.३ पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसात वाढ होऊन ढगफुटीची शक्यता वर्तविल्याने बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. (शहर प्रतिनिधी)