दारूच्या अवैध विक्रीला उधाण
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:07+5:302016-01-02T08:34:07+5:30
पवनी तालुक्यातील कोंढा परिसरातून चंद्रपूर जिल्ह्यात दारुची अवैध विक्री करण्यात येत आहे.

दारूच्या अवैध विक्रीला उधाण
कोंढा परिसरातून होते विक्री : उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने धास्तावले
कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरातून चंद्रपूर जिल्ह्यात दारुची अवैध विक्री करण्यात येत आहे. मागील आठवड्यात दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना दारूसाठ्याच्या एका वाहनासह पकडले होते. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कोंढा येथून अवैधपणे दिवसरात्र देशी दारुच्या पेट्या लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविले जाते. यामध्ये मोठे रॅकेट आहे. यासंबंधी प्रथम लोकमतने ही बाब समोर आणली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आल्याने नविन वर्षाच्या कार्यक्रमासाठी तेथे दारुच्या विक्रीवर मोठा नफा कमविण्याची संधी अवैध दारू विक्रेत्यांना चालून आली आहे. एका चारचाकी वाहतुन ९० मिली देशी दारुच्या ८० पेट्या नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात साकोलीचे निरीक्षक बी. डी. पटले यांनी लाखांदूर फाट्याजवळ सिंदपूरी येथे वाहनाची तपासणी केली असता अवैध दारुचा प्रचंड साठा सापडला. उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुसह नरेश मार्कंड पडोळे रा. मांगली ता. पवनी तसेच चेतन ताराचंद रामटेके रा. तावशी ता. लाखांदूर यांना अटक केली.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने नववर्षानिमित्त अवैधपणे दारुविक्री करण्यासाठी दारु नेली जात होती. पवनी तालुका चंद्रपुर जिल्ह्याला लागुन असल्याने अनेक देशी दारु दुकानातून अवैधपणे दारु विकणारे रॅकेट सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यावर पवनी तालुक्याची सीमा लागून असल्याने मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनातून देशी, विदेशी दारुचा साठा विक्रीसाठी नेण्यात येतो. कोंढा येथून एका दारु दुकानातून ही दारुची वाहतूक होत असल्याचे बोलले जाते. एक दिवसाला हजारो दारुच्या ९० मिलीच्या बॉटल विकल्या जात आहे. हे उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात आले. ही कारवाई साकोलीचे उत्पादन शुल्क निरीक्षक डी. बी. पटले यांच्या नेतृत्वात एन.एन. उईनवार, एस. डी. लांबट, जी. एस. सिंदपूरे, एस. डी. गिऱ्हेपुंजे, आर. एम. श्रीरंग, एम. एस. ढेंगे यांनी केली असून कोंढा परिसरातील गावात कोंढा येथून दुचाकी व चारचाकी वाहनाने दिवसाला अवैध दारुची वाहतूक करुन अवैधपणे विकली जात आहे. याचा बंदोबस्त पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावे अशी मागणी कोंढा परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)