जादूटोण्याच्या संशयावरून दांपत्यास मारहाण
By Admin | Updated: October 16, 2016 00:28 IST2016-10-16T00:28:41+5:302016-10-16T00:28:41+5:30
जादूटोणा केल्याच्या संशयावरून टिळक वॉर्डातील एका दांपत्यास जबर मारहाण करण्यात आली असून...

जादूटोण्याच्या संशयावरून दांपत्यास मारहाण
पत्रपरिषद : आरोपीवर कडक कारवाईची मागणी
मोहाडी : जादूटोणा केल्याच्या संशयावरून टिळक वॉर्डातील एका दांपत्यास जबर मारहाण करण्यात आली असून त्या दांपत्यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात दहा दिवसांपासून उपचार सुरु आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई न केल्यास भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच होणाऱ्या परिणामास प्रशासनाला जबाबदार ठरविण्यात येईल, असा इशारा पत्रपरिषदेत उपस्थित भूमेश्वर श्रीपाद व अन्य व्यक्तींनी दिला आहे.
मोहाडी येथील टिळक वॉर्डात राहणारे वामन श्रीपाद हे कापड विक्रीचा व्यवसाय करतात. वामन श्रीपाद यांच्या शेजारी शालीक न्यायखोर कुटुंबासह राहतात. काही दिवसांपासून त्यांचा मुलगा सचिन न्यायखोर यांचा कान दुखत असल्याने त्याच्यावर वामन श्रीपाद यांनी जादूटोणा, करणी केली आहे, असे एका बाबाने सांगितल्याने प्र्रकाश न्यायखोर, शालीक न्यायखोर व सचिन न्यायखोर यांनी ८ आॅक्टोबरला वामन श्रीपाद यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली. तसेच वामन श्रीपाद यांना ५०० फुट दूर ओढत नेले व तिथे काठीने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचे हाड क्रॅक झाले व मारहाणीमुळे ते बेशुद्ध पडले. त्यांची पत्नी भांडण सोडवायला आली असता तिलाही जबर मारहाण करण्यात आली. या दांपत्यांना त्वरीत सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
यापूर्वीही १ जुलै रोजी याच आरोपींनी घरी येऊन धमकी दिली होती. त्याची तक्रार मोहाडी पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना करण्यात आली होती व गैरअर्जदारावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्या तक्रारीला गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळेच सदर आरोपींची हिंमत वाढून त्यांनी जबर मारहाण केली. परंतु मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अजूनपर्यंत अटकच केली नाही. जर जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करणाऱ्या आरोपीवर सात दिवसात कठोर कारवाई करण्यात आली नाही तर पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पत्रपरिषदेत उपस्थित भूमेश्वर श्रीपाद, नगरपरिषद अध्यक्ष स्वाती निमजे, नगरसेवक अरुणा श्रीपादसह अनेक नागरिकांनी दिला आहे. या प्रकरणात मोहाडी येथे कलम ३२४, २९४, ३४ भादंवि तसेच आर.डब्लू. महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा ३(१), ३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
(शहर प्रतिनिधी)
आरोपी विरोधात पुरावे गोळा करणे सुरु असून सविस्तर तपास करण्यात येत आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.
- सुहास चौधरी
ठाणेदार, मोहाडी