जलाशयातील दरवाजा कोसळला
By Admin | Updated: September 25, 2014 23:17 IST2014-09-25T23:17:48+5:302014-09-25T23:17:48+5:30
सिहोरा परिसरातील खरीप हंगामात धान पिकाला चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करताना चिकारचे जीर्ण दरवाजा कोसळला आहे. यामुळे पाणी वाटप प्रभावित झाले आहे.

जलाशयातील दरवाजा कोसळला
धान पिकाला पाणी नाही : खरीप हंगामात पाणी वाटप प्रभावित
चुल्हाड/सिहोरा : सिहोरा परिसरातील खरीप हंगामात धान पिकाला चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करताना चिकारचे जीर्ण दरवाजा कोसळला आहे. यामुळे पाणी वाटप प्रभावित झाले आहे.
सिहोरा परिसरात १० हजार हेक्टर आर शेतीला सिंचित करण्याची क्षमता विस्तीर्ण चांदपूर जलाशयात आहे. परंतु जलाशयात पाणी साठवणुक होत नाही. याशिवाय जलाशयाचे खोलीकरण करण्यात न आल्यामुळे ८ हजार हेक्टर शेतीला पाणी वाटप करण्यात येत आहे. परिसरातील अधिकाधिक शेती ओलीताखाली आणण्यासाठी बावनथडी नदीवर ११० कोटी खर्चून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पावसाळ्यात उपसा करण्यात आलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. कोट्यवधीचा प्रकल्प साकारताना १४ हजार ९३८ हेक्टर सिंचित क्षेत्र निर्धारित करण्यात आलेला आहे. परंतु आजवर निर्धारित क्षेत्रात पाणी वाटप करता आले नाही. विस्तीर्ण चांदपूर जलाशयाची निर्मिती ब्रिटीश कालीन आहे.
जलाशयाची पाळ आणि चिकार (ढोला) चे बांधकाम ब्रिटीश राजवटीत झाले आहे. जलाशयाची पाळ व चिकारला १०७ वर्ष झाले आहेत. सध्या स्थित पाणी वाटप करणारा चिकार ढोला जीर्ण झालेला आहे. याच चिकार मधून १० हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटप करताना पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
पाणी वाटप करताना चिकारचे दरवाजे उघडताना यंत्रणेला जिकरीचे ठरत आहे. पाणी वाटपात चिकारमध्ये कंपन होत असल्याने यंत्रणा भयभित होत आहे.
जीर्ण चिकार कधी कोसळेल याचा नेम नाही. यासंदर्भात नव्याने चिकार ढोला बांधकाम करावे, याचा पाठपुरावा ‘लोकमत’ने केला आहे. चिकार कोसळल्यास ८-१० गावांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. यंदा खरीप हंगामातील धान पिकाला पाणी वाटपाची प्रक्रिया दि.१८ पासून सुरू करण्यात आलेली आहे.
डावा आणि उजवा कालवा अंतर्गत ८,१०० हेक्टर आर शेतीला पाणी वाटप करण्यात येत आहे. हे पाणी वाटप करताना चिकारचा लोखंडी दरवाजा उघडण्यात आलेला आहे.
दरम्यान पाणी वाटप सुरू असताना दि.१९ ला सकाळी ८ च्या सुमारास जीर्ण दरवाजा कोसळला आहे. लोखंडी साखळी तुटली असल्याने पाणी वाटप बंद झाले आहे. २४ तासात कालवे बंद झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. लघु पाठबंधारे विभागाच्या यंत्रणेने तुटलेला दरवाजा उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केला आहेत. तुमसरचे वर्क शॉप कामगाराची यात मदत घेण्यात आली आहे.
४८ तासानंतर यात यश आले असून तुटलेला दरवाजा बाहेर काढण्यात आलेला आहे. चिकारला आता दरवाजा नसल्याने संपूर्ण ३० फूट पाण्याचा विसर्ग होणार आहे. मध्यंतरी दरवाजा बंद करून पाणी अडविण्याची प्रक्रिया नाही. जलाशयातील संपूर्ण पाणी रिकामे करण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे. कालवे, नहर पाण्याने भरून वाहत आहे. दरवाज्याविना चिकार उभा आहे. (वार्ताहर)