धार्मिक विधीचा निधी दिला दान
By Admin | Updated: July 30, 2016 00:25 IST2016-07-30T00:25:51+5:302016-07-30T00:25:51+5:30
मृत्यू शाश्वत सत्य. मृत्यूनंतर उरतात केवळ आठवणी व कर्म.

धार्मिक विधीचा निधी दिला दान
वरठी येथील घटना : नेत्रदान करून समाजासमोर आदर्श
वरठी : मृत्यू शाश्वत सत्य. मृत्यूनंतर उरतात केवळ आठवणी व कर्म. पण, त्या आठवणी सामाजिक बांधिलकीच्या रूपाने सर्वश्रृत व्हाव्यात यासाठी वरठी येथील गजभिये कुटूंबियानी वडिलांच्या मृत्यूनंतर नेत्रदानाचा निर्णय व धार्मिक विधीवर येणारा खर्च दान करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
जिल्हा परिषदेचे मजी सदस्य दिलीप उके यांच्या प्रोत्साहाने उचलले पाऊल भविष्यात वरठी व परिसरातील नवीन आदर्श घालणार यात शंका नाही.
शास्त्री वॉर्डातील रहिवाशी यादोराव गजभिये (६८) यांचे २७ जुलैच्या रात्री निधन झाले. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते अनेक दिवसापासून खाटेवर होते. त्यांच्या मृत्यूनंतर आप्तस्वकीय म्हणून दिलीप उके रात्री उपस्थित झाले. दरम्यान मृतक यादोराव यांची बहिण जिल्हा परिषद सदस्य धर्मशिला उके व जावई दिलीप उके यांनी मुलगा संजय, सुनिल आणि पत्नी शिवंका यांना अवयव दान करण्याचा सल्ला दिला. नेत्रदान केले तर दोन जणांना जग बघता येईल. हे पटवून सांगितले.
नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर आरोग्य विभागाला कळविण्यात आले. पहाटे भंडारा येथून आरोग्य विभागाचे पथक वरठी येथे दाखल झाले. नेत्रदानाची प्रक्रिया पुर्ण केली. मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी होणारा खर्च सुध्दा सार्वजनिक उपक्रमाकरिता दान देण्याचे ठरले. वरठी येथील सार्वजनिक बौध्द विहाराच्या बांधकामाकरिता ११ हजार रुपये दान देण्यात आले. गजभिये कुटूंबियांनी उचलले हे पाऊल आदर्श निर्माण करणारे आहे. (वार्ताहर)