दस्तऐवज ओलेचिंब; जबाबदार कोण?
By Admin | Updated: July 23, 2014 23:27 IST2014-07-23T23:27:11+5:302014-07-23T23:27:11+5:30
येथील तहसील कार्यालय इंग्रजकालीन असून या कार्यालयाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दुरूस्तीअभावी या कार्यालयाला वाईट दिवस आले आहेत. पावसाळ्यात पाणी गळतीमुळे या कार्यालयातील

दस्तऐवज ओलेचिंब; जबाबदार कोण?
दोष कुणाचा : साकोली तहसील कार्यालय दुरूस्तीसाठी निधी नाही
साकोली : येथील तहसील कार्यालय इंग्रजकालीन असून या कार्यालयाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दुरूस्तीअभावी या कार्यालयाला वाईट दिवस आले आहेत. पावसाळ्यात पाणी गळतीमुळे या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे खराब झाली. याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग की तहसील कार्यालय हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी पुरातन काळापासून उपयोगात असलेले दस्ताऐवज मात्र खराब झाले आहे.
येथील तहसील कार्यालयाची इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी यासाठी तहसीलदार साकोली यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम राज्य विभाग भंडारा यांना १५ जून २०१३, २६ जून २०१३, १ मार्च २०१४, २२ एप्रिल २०१४ व २५ मे २०१४ ला लेखी पत्र पाठवून तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या छतातून पाणी गळत असून भितीस नुकसान होत आहे. त्यामुळे प्राणहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय अभिलेख खराब होऊ शकते, कार्यालयातील विद्युत उपकरणे खराब होवून जिवीतहानी होऊ शकते. त्यामुळे या कार्यालयाची दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली मात्र या पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काहीच कार्यवाही केली नाही. परिणामी संततधार पावसामुळे या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे अखेर खराब झालेली आहे.
साकोली तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन असून या इमारतीची साधी डागडुजीही झालेली नाही. या तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिकांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना या कार्यालयाची गरज पडते.
दुरूस्तीसाठी निधी आला नाही
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता निपाने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, तहसीलदार यांच्या पत्रानुसार सदर कार्यालयाच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र निधी उपलब्ध न झाल्यामुळे दुरूस्ती करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)