चमत्काराकडे न वळता वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा
By Admin | Updated: November 20, 2014 22:46 IST2014-11-20T22:46:27+5:302014-11-20T22:46:27+5:30
चमत्कारालाच नमस्कार करण्याची पद्धती आहे. त्यामुळे भारतात ढोंगीबाबांचे प्रस्थ वाढलेले आहे. ढोंगीबाबांचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानवी मनात खोलवर रूजविल्या गेले आहे. परंतु,

चमत्काराकडे न वळता वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा
भंडारा : चमत्कारालाच नमस्कार करण्याची पद्धती आहे. त्यामुळे भारतात ढोंगीबाबांचे प्रस्थ वाढलेले आहे. ढोंगीबाबांचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानवी मनात खोलवर रूजविल्या गेले आहे. परंतु, एखादा बाबा हवेत हात फिरवून कुठलिही वस्तु कशी आणतात, मंत्रोच्चाराने अग्नी कसा प्रज्वलित होतो. इतकेच नव्हे तर अंगात शिरलेले भूत उतरविण्याचे सोंग कसे केले जाते, यावर जादूटोणा विरोधी कायद्यातंर्गत कारवाई झाली पाहिजे असे सांगून मानवी जीवन जगताना चमत्काराकडे न वळता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांनी केले.
जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी मिलींद बन्सोड होते. मंचावर पीआयएमसीचे सदस्य सुरेश झुरमुरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डी.एन.धारगावे, अंनिसचे जिल्हा संघटक वसंत लाखे, जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, सचिव मुलचंद कुकडे, प्रशांत सपाटे उपस्थित होते.
यावेळी प्रा.श्याम मानव यांनी सत्यसाईबाबा कशाप्रकारचे चमत्कार करून दाखवित होते, त्याचे प्रात्यक्षिक सांगून त्यामागील हातचलाखी करुन दाखविली. हवेतून सोन्याची चेन काढणे, सोन्याची अंगठी निर्माण करणे, अग्नी प्रज्वलित करणे आणि त्यामागील हातचलाखी समजावून सांगताच उपस्थितांच्या मनातील गैरसमज दूर झाले. इतकेच नव्हे तर काही लहान मुलांना मंचावर बोलावून भूत कसे काढले जाते, याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.
एका तांब्याच्या गडव्यामध्ये तांदूळ भरून त्या एक त्रिशुळ टाकून संपूर्ण तांबा उचलल्या गेला. यामागील विज्ञान समजावून सांगितला. याशिवाय हे प्रयोग चिमुकल्यांकडूनही करवून घेतले. एकूणच छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी चमत्कार व अंधश्रद्धा दूर केली. राज्य शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा नेमका काय सांगतो, हे सविस्तर समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अंनिसचे तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शिल्पा बन्सोड यांनी तर आभारप्रदर्शन सहायक आयुक्त डी.एन.धारगावे यांनी केले. कार्यक्रमासाठी अंनिसचे ग्यानचंद जांभुळकर, किर्ती गणवीर, अशोक गायधनी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)