अकाऊंटंटवर विसंबून राहू नये
By Admin | Updated: July 2, 2014 23:13 IST2014-07-02T23:13:32+5:302014-07-02T23:13:32+5:30
शासनाकडे जमा होणाऱ्या एकूण करापैकी ५० टक्के कर हा टी.डी.एस. कपातीतून जमा होतो. ज्यामध्ये आयकर, वस्तू व सेवा पुरवठादारांवरील कर, वन उत्पादने, मद्य यावरील कराचा समावेश आहे.

अकाऊंटंटवर विसंबून राहू नये
टीडीएस कार्यशाळा : सतीश गोयल यांचे प्रतिपादन
भंडारा : शासनाकडे जमा होणाऱ्या एकूण करापैकी ५० टक्के कर हा टी.डी.एस. कपातीतून जमा होतो. ज्यामध्ये आयकर, वस्तू व सेवा पुरवठादारांवरील कर, वन उत्पादने, मद्य यावरील कराचा समावेश आहे. ही कर कपात कशी करायची, त्याचे नियम, फायदे-तोटे, न केल्यास शिक्षा इत्यादी बाबीची माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करुन घ्यावी. केवळ चार्टर्ड अकाऊंटंटवर विसंबून न राहता अधिकाऱ्यांनी याकडे जबाबदारीने लक्ष द्यावे, असे आवाहन आयकर आयुक्त सतीश गोयल यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयकर विभाग नागपूर आणि भंडारा जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी ेटी.डी.एस. या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्ष स्थानावरुन गोयल बोलत होते.
याप्रसंगी आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी. रविकुमार, सहआयुक्त श्रमदीप सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, नागपूर रेंज १ चे आयकर अधिकारी पंकज देशमुख, जिल्हा परिषद लेखा व वित्त अधिकारी केदार, जिल्हा कोषागार अधिकारी अतुल गायकवाड उपस्थित होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आयकर हा विषय अवघड असला तरी प्रत्येकाने तो समजून घेतला पाहिजे. आज आयकर आयुक्तांनी हा सेमीनार येथे आयोजित करुन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना विषय समजून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
नागपूर रेंज १ चे आयकर अधिकारी पंकज देशमुख यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे टी.डी.एस. संदर्भातील माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना समजावून सांगितली. ते म्हणाले, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आयकर कपात करणे तसेच शासनाला वस्तु व सेवांचा पुरवठा करणाऱ्यांकडून टी.डी.एस. कपात करणे आवश्यक आहे. कपात केल्यानंतर अधिकारी जी माहिती देतील त्या आधारावर तो टीडीएस रिटर्न आॅनलाईन भरतो. टी.डी.एस. रिटर्न भरताना पॅन नंबर, टॅन क्रमांक चुकीचा देणे, पिन क्रमांक चुकीचा दिल्यामुळे त्यामध्ये त्रुट्या निर्माण होतात. त्रुट्या झाल्या तर आयकर विभाग गाझियाबाद येथून पत्र येतात. झालेल्या चुकीची दुरुस्तीसाठी पुन्हा अधिकाऱ्यांचा वेळ व पैसा वाया जातो असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक संजय अपुरकर यांनी केले. संचालन कसबेकर यांनी केले तर मटलानी यांनी आभार मानले.(नगर प्रतिनिधी)