प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर देता का डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:35 IST2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:35:02+5:30
विशेष म्हणजे, मंजूर असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे कंत्राटी स्वरूपाची आहे. महत्त्वपूर्ण पदे कंत्राटी स्वरूपाची असल्याने आरोग्य विभागाचे कामकाज प्रभावित झाले आहे. या केंद्रांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रिक्त पदांमुळे बीएएमएस डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागतो. एमबीबीएस डॉक्टर राहिल्यास कामाची गती अधिक वाढेल. विविध आजारांवर उपचार करणे सोपे होईल.

प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर देता का डॉक्टर
देवानंद नंदेश्वर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ६६ एमबीबीएस डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी २९ पदे भरलेली आहेत. उर्वरित ३७ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या अनेक ठिकाणी बीएएमएस डॉक्टरांकडे कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मंजूर असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे कंत्राटी स्वरूपाची आहे. महत्त्वपूर्ण पदे कंत्राटी स्वरूपाची असल्याने आरोग्य विभागाचे कामकाज प्रभावित झाले आहे. या केंद्रांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रिक्त पदांमुळे बीएएमएस डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागतो.
एमबीबीएस डॉक्टर राहिल्यास कामाची गती अधिक वाढेल. विविध आजारांवर उपचार करणे सोपे होईल. यामुळे ही पदे कायमस्वरूपी भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुकती करण्यात संदर्भात प्रशासनाशी अनेकदा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्यानुसार भरतीसुद्धा केली जाते. मात्र या भरती विषयी उदासिनता दिसून येते.
आरोग्य उपकेंद्र बीएएमएस डॉक्टरांच्या हवाली
जिल्ह्यात १९३ आरोग्य उपकेंद्र आहेत. यासाठी डॉक्टरांची १५२ पदे मंजूर असून १४२ डॉक्टर कार्यरत आहेत. १० डॉक्टर ट्रेनींगवरील आहेत. अशा ठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीएएमएस डॉक्टरांना काम करावे लागत आहे. रिक्त पदांमुळे आरोग्य विभागात बीएएमएस डॉक्टरांवर संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचे दिसून येते.
रिक्त पदे भरण्यास शासनाची उदासिनता
जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आहे. नागरिकांचा शासकीय आरोग्य यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. रिक्त पदे भरण्याची जबाबदारी वरिष्ठांची आहे. मात्र रिक्त पदे भरण्यास शासनाची उदासिनता असल्याने अनेक आरोग्य केंद्रावरील रिक्त पदांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपचार सेवा सुरळीत सुरू असली तरी त्याचा ताण येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे.