६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे डीजे सर्वांसाठीच घातक
By Admin | Updated: September 5, 2016 00:43 IST2016-09-05T00:43:49+5:302016-09-05T00:43:49+5:30
‘श्री’चे आगमन जवळ येताच गणेशोत्सव मंडळासह सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे.

६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे डीजे सर्वांसाठीच घातक
भंडारा : ‘श्री’चे आगमन जवळ येताच गणेशोत्सव मंडळासह सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी बैठकी सुरू आहेत. गणराजाचे स्वागत करता गणेशोत्सव मंडळे डी. जे. लावत असतात. मात्र, हा डी.जे. व्यापारी क्षेत्रात अधिकाधिक ६५ डेसिबलपेक्षा अधिक नको. त्यापेक्षा अधिक आवाज आहे काय, याची तपासणी करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागत आहेत. तेव्हा गणेश मंडळांनो सावधान! पोलीस व प्रदूषण नियंत्रण यंत्रणा मागावर आहेत. त्यात गणेश मंडळाच्या डी.जे.चा आवाज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करताना आढळून आला, तर तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षे कारागृहात खडी फोडायला जावे लागू शकते. जिल्ह्यात ५५४ गणेशोत्सव मंडळ ‘श्री’ची स्थापना करणार असले तरी त्या मंडळांनी नोंदणी केली किंवा नाही, याची छाननी धर्मदाय आयुक्तांचे पथक करणार आहे.
आवाज किती सहन केला जाऊ शकतो, याबाबत निकष ठरविण्यात आले आहेत. त्या निकषानुसार, सर्वोच्च न्यायालयाने डी.जे.च्या आवाजावर निर्बंध घातले आहेत. कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असला की, डी.जे. लावला जातो. मात्र, गेल्या वर्षी सोलापूर येथे डी.जे.च्या आवाजाने एका घराची भिंत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्वत: पुढाकार घेऊन डी. जे. लावणे बंद केले आहे. परंतु विदर्भातील गणेशोत्सव मंडळांनी अद्याप तसा पुढाकार घेतलेला नाही. त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणेश मंडळांना दिशानिर्देश जारी केले आहेत. त्या दिशानिर्देशांचे पालन केले जाते, अथवा नाही, याची तडताळणी करण्यासाठी विविध विभागांची पथके निर्माण करण्यात आली आहेत. त्यातही डी.जे.च्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्याकरिता कठोर पाऊले उचलण्यात येत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे बंधन गणेशोत्सव मंडळांवर आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस विभागाने घेतली आहे. त्यामुळे पोलीस विभागाने डी. जे. लावताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करावे. न्यायालयाच्या निर्देशानुसार डी. जे.चा आवाज ठेवावा. शांतता क्षेत्र म्हणजे शाळा, महाविद्यालयाचे आणि रुग्णालय परिसरात अधिकाधिक दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल आवाजाची मर्यादा ठरविण्यात आलेली आहे. या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजाचा डी.जे. मिरवणुकीत आढळल्यास ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दोषी गणेश मंडळाला तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असून तीन वर्षे शिक्षा केली जाऊ शकते. (शहर प्रतिनिधी)
भंडाराचे शांतता झोन रस्त्यावर
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद चौक ते त्रिमूर्ती चौक येथून मुस्लिम लायब्ररीचौक हा परिसर शांतता झोनसाठी परिचित आहे. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालय पर्यंतचा परिसराचा समावेश आहे. शहरातील शाळा महाविद्यालयाचा शांतता झोनमध्ये समावेश आहे. हे मार्ग अत्यंत संवेदनशील मानले जातात. शाळा, महाविद्यालय, रूग्णालयाचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या शांतता क्षेत्रातून डी. जे. लावून मिरवणूक काढणे शक्य नाही. शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल आवाज मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आवाज डी.जे.चा असतो.
गणेशोत्सव मंडळाची नोंदणी तपासणार
अनेक गणेशोत्सव मंडळांनी धमर्दाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली नाही. हे प्रशासनाच्या लक्षात आले असल्याने धमर्दाय आयुक्त कार्यालयाने गणेशोत्सव मंडळाची नोंदणी तपासण्याचे ठरविले आहे. त्याकरिता पथक गठित करण्यात आले आहे. ज्या मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्ताकडे केलेली नसेल, त्या मंडळाला सार्वजनिक ठिकाणावर मूर्ती स्थापनेची परवानगी देणार नाही. तसेच गणेश मूर्ती स्थापना करताना पालिकेची परवानगी आवश्यक करण्यात आलेली आहे.
५५४ गणेश मूर्तींची स्थापना होणार
जिल्हाभरात ५५४ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्री’ची स्थापना करण्यात येणार आहे. सर्वाधिक खासगी मूर्तींची स्थापना केल्या जाणार आहेत. सोबतच सार्वजनिक ठिकाणी नोंदणीकृत गणेश मंडळांच्या मूर्तीही राहणार आहेत. यात आणखी वाढ अपेक्षित आहे.