दिवाळी खरेदीची उलाढाल कोटीत

By Admin | Updated: November 15, 2015 00:19 IST2015-11-15T00:19:14+5:302015-11-15T00:19:14+5:30

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी व भाऊबीजनिमित्त शुक्रवारी सोने-चांदी, मोबाईल ....

Diwali shopping worth crores | दिवाळी खरेदीची उलाढाल कोटीत

दिवाळी खरेदीची उलाढाल कोटीत

सोन्याला मागणी : मोबाईल, एलसीडी, आदींची मोठ्या प्रमाणात विक्री; गर्दीमुळे शहरातील वाहतुकीवरही ताण
भंडारा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी व भाऊबीजनिमित्त शुक्रवारी सोने-चांदी, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेमध्ये कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली. आकर्षक योजना, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि कर्जसुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा यथेच्छ आनंद लुटला.
यंदा दिवाळी पाडव्याच्या खरेदीवर मोहोर उमटविली ती मोबाईल, सोने बाजारपेठेने. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ६0 टक्क्यांची वृद्धी या बाजारपेठेने नोंदविल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कारण सोन्याच्या दर २६ हजार ७०० च्या आसपास पोहोचला होता. होम अप्लायसेन्स, सोने-चांदी बाजार तसेच मोबाईल शॉपी गर्दीने फुलल्या होत्या. सकाळपासूनच ग्राहकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही प्रचंड ताण पडला. ग्राहकांनी अक्षरश: रांगा लावून खरेदी केली.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत टीव्ही, एलईडी, होम थिएटर, सीडी प्लेयर तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉशिंग मशीन, फ्रीज या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. शहरातील बहुतांश इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून शोरूममध्ये शून्य टक्के व्याजदर आणि प्रथमच झिरो डाउन पेमेंटवर खरेदीची आॅफर देण्यात आली होती. ग्राहकांनी या योजनेचा पुरेपूर फायदा घेतला. नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांना शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बाजारपठेत दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून चांगली मागणी होती. विविध नामांकित कंपन्यांच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक शिलाई मशिन्सनाही चांगली मागणी होती. विविध फायनान्स कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी झिरो डाउन पेमेंट, एक्स्ट्रा वॉरटी आॅफर, लकी ड्रॉ, अशा क्लृप्त्या वापरून ग्राहकांना आकर्षित केले.
इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी शहरातील दुकाने गर्दीने फुलली होती. 'एलईडी'च्या विविध श्रेणी साडेसात हजारांपासून ते ५० हजार, फ्रिज १० हजार ते ९० हजार, वॉशिंग मशीन साडेचार हजार ते २0 हजार, मायक्रोवेव्ह ओव्हन ७ ते २५ हजार तसेच होम थिएटर सहा हजार ते अडीच लाखांपर्यंत उपलब्ध आहेत.
बाजारातील स्पर्धेमुळे तसेच झिरो डाऊन पेमेंट योजनेमुळे किंमतलाभाचा फायदा ग्राहकांना होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन यांच्या खरेदीला ग्राहकांनी पहिली पसंती दिली, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. विविध कंपन्यांच्या अँँड्रॉईड मोबाईल्सना जास्त मागणी होती. गतवर्षीच्या तुलनेत अँँड्रॉईड मोबाईल्सच्या विक्रीमध्ये सरासरी ६0 टक्क्यांची वृद्धी झाली.
बेसिक अँप्लिकेशन्सच्या तुलनेत अँँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनची सुविधा असलेल्या मोबाईल्सनाही मोठी मागणी होती. शालेय मुलांनीही अँँड्रॉईड मोबाईल्सच्या खरेदीला पसंती दिली. अगदी २२५0 पासून ७४ हजारांपर्यंतचे हँडसेट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. महागड्या व नामांकित कंपन्यांच्या मोबाईलला ग्राहकांची पहिली पसंती असल्याचे दिसून आले.
दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या खरेदीचा वेगही मोठा होता. ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने दुचाकी खरेदी केल्या; तर चारचाकी गाड्यांमध्ये ग्राहकांची पहिली पसंती राहिली. लकी ड्रॉ, खरेदीवर बक्षीस, सुवर्ण भिशी यासारख्या योजनांमुळे सोने-चांदीच्या बाजारपेठेला चांगला प्रतिसाद लाभला. अंदाजे २० ते ३० कोटी रुपयांची उलाढाल या बाजारपेठेत झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Diwali shopping worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.