८० जिल्हा परिषद शाळांना वर्गखोल्यांची 'दिवाळी भेट'
By Admin | Updated: November 6, 2014 00:59 IST2014-11-06T00:59:06+5:302014-11-06T00:59:06+5:30
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा व अपंगाना सर्वसमावित शिक्षण मिळावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.

८० जिल्हा परिषद शाळांना वर्गखोल्यांची 'दिवाळी भेट'
भंडारा : जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा व अपंगाना सर्वसमावित शिक्षण मिळावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. याअनुशंगाने जिल्ह्यातील ८० जिल्हा परिषद शाळांना नविन वर्गखोल्या बांधकामाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाला दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यामातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षण प्रवाहात आणण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासोबतच अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत शिक्षण मिळावे, यासाठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. अपंगांना शाळेत प्रवेश करताना अडचण निर्माण होऊ नये, म्हणून रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.
वार्षीक कार्य योजना अंदाजपत्रक सन २०१४-१५ अंतर्गत ८० जिल्हा परिषद शाळांना नविन वर्गखोल्यांची मंजुरी मिळाली आहे. या वर्गखोल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या व शिक्षक संख्येनुसार मंजुर करण्यात आल्या आहेत. इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळांना नविन धोरणानुसार पाचवा वर्ग जोडण्यात आल्याने वर्गखोल्यांची गरज भासली. त्यानुसार या वर्ग खोल्याना मंजुरी मिळाली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील २२३ शाळांना वाढीव वर्ग खोल्या मंजुरीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यातील ८० वर्गखोल्यांना नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. यासोबतच जुन्या बांधकाम झालेल्या वर्गखोल्यांपैकी १७ शाळांना रॅम्प मंजूर करण्यात आले आहे. या रॅम्पसाठी प्रत्येकी २० हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.
८० वर्गखोल्यांसाठी सर्व शिक्षा अभियान विभागाने ४.५० कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी शासनाने २ कोटींचा निधी मंजूर करून तो वळता केला आहे. हा निधी सर्व शिक्षा अभियान विभागाला प्राप्त झाला आहे.
एका वर्गखोलीसाठी प्रत्येकी ५ लाख ५० हजार प्राप्त झाले आहे. या रक्कमेत रॅम्प, विद्युतीकरण व साहित्य खरेदी करावयाची आहे. साहित्य खरेदीवर ३० हजार तर विद्युतीकरणावर २० हजार रूपये खर्च करावयाचे आहे. (शहर प्रतिनिधी)