जिल्हा रोजगारात अव्वल व्हावा
By Admin | Updated: March 20, 2017 00:24 IST2017-03-20T00:24:08+5:302017-03-20T00:24:08+5:30
कौशल्यावर आधारित रोजगार प्राप्त व्हावा यासाठी भंडारा जिल्हयात कौशल्य विकास शिक्षण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ...

जिल्हा रोजगारात अव्वल व्हावा
नाना पटोले : कौशल्य विकास शिक्षण सुरु करणार, बचतगटाचे आर्थिक सक्षमीकरण
भंडारा : कौशल्यावर आधारित रोजगार प्राप्त व्हावा यासाठी भंडारा जिल्हयात कौशल्य विकास शिक्षण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी रोजगार मेळाव्यात दिली. आपला जिल्हा रोजगारात अव्वल व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी त्यावेळी व्यक्त केली.
दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत नगर परिषद भंडारा व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा व लाभार्थी नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
मुस्लीम लॉयब्ररी सभागृह या ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनिल मेंढे होते. नगरपालिका उपाध्यक्ष कवलजितसिंग चढ्ढा, सभापती आशा उईके, भूमेश्वरी बोरकर, जयश्री बोरकर, वनिता कुथे, ब्रिजमोहन कटकवार, मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा कौशल्य व रोजगार अधिकारी बालाजी मरे तसेच नगरसेवक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाने रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले असुन युवकांनी कौशल्य आत्मसात करून रोजगार प्राप्त करावा असे पटोले म्हणाले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय सुरु करावा. आपण रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा असे ते म्हणाले. या मेळाव्याच्या माध्यमातून महिला बचत गट सक्षम व्हावेत असे सांगून ते म्हणाले की, बचत गटाचा उपयोग आपल्या विकासासाठी करा. नगर परिषदने शहर विकासाचा सर्वांगिण आराखडा तयार करावा यासाठी लागणारा निधी केंद्र सरकार देईल असे ते म्हणाले. शहरात ४००० घरकुल बांधण्याची योजना तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
नगरपरिषदेने ३४९ लाभाथ्यार्ना कौशल्य प्रशिक्षण दिले असुन त्यापैकी ६५ जनानी आपला रोजगार सुरु केला आहे. १९ बचतगटाना ३० लाखाचे कर्ज दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी ६७८ बचतगट स्थापन करण्यात आले.नगर परिषदेच्या वतीने २०९ महिलांना अर्थसहाय्य करण्यात आले. मुद्रा योजने अंर्तगतही कर्ज पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण पडोळे यांनी प्रस्ताविकात दिली.
नगरपरिषद क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील शहरी, गरीब कुटूंबातील युवक-युवती व स्त्री- पुरुषांना कौशल्य विकास प्रशिक्षण देवून रोजगाराची संधी उपलब्ध करण्याकरीता बाजारातील कौशल्याच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मोफत दिले जाईल. तसेच नामांकित कंपन्यामार्फत रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी कुठे- कुठे उपलब्ध आहेत. याबाबतची माहिती या मेळाव्यात देण्यात आली. यावेळी कंपन्यांचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण पडोळे यांनी संचालन व प्रास्ताविक केले. यावेळी युवक ,युवती व महिला बचतगट मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)