सैन्य भरती रॅलीसाठी जिल्ह्याची निवड

By Admin | Updated: August 28, 2015 01:04 IST2015-08-28T01:04:08+5:302015-08-28T01:04:08+5:30

विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी भारतीय सैन्य दलाने ६ ते १७ जानेवारी २०१६ दरम्यान सैन्य भरती रॅली आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.

District Selection for Military Recruitment Rally | सैन्य भरती रॅलीसाठी जिल्ह्याची निवड

सैन्य भरती रॅलीसाठी जिल्ह्याची निवड

भंडारा : विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी भारतीय सैन्य दलाने ६ ते १७ जानेवारी २०१६ दरम्यान सैन्य भरती रॅली आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. या रॅलीसाठी भंडारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजन करुन सैन्य भरती रॅली यशस्वी करण्यात येईल, अशी हमी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती संदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चरण वाघमारे, सेना भरती कार्यालयाचे नागपूर विभागाचे भरती संचालक कर्नल महेंद्रकुमार जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे उपस्थित होते. ही रॅली विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या दहा जिल्ह्यांसाठी भंडारा शहरात छत्रपती शिवाजी जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. सैन्य भरतीसाठी नेहमी खुली रॅली आयोजित करण्यात येत असते. मात्र यावेळी पहिल्यांदाच आॅनलाईन नोंदणी उमेदवारांना करावी लागणार आहे. संकेतस्थळावर उमेदवारांना रॅलीच्या ४५ दिवसअगोदर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल.
जिल्ह्यात या रॅलीच्या आयोजनासंबंधी नियोजन करतांना मोठया प्रमाणात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल. उमेदवारांना राहण्यासाठी मंगल कार्यालय, शाळा आणि जिल्हा क्रिडा संकुल येथे व्यवस्था करण्यात यावी. तसेच उमेदवारांना येण्या-जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसेस सोडाव्यात आणि रेल्वे विभागाने भंडाऱ्याकडे येणाऱ्या रेल्वे गाडयांना अतिरिक्त बोगी द्यावी, अशी मागणी संबंधितांना करण्यात येणार आहे. बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे, शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, सुभाष गांगरेड्डीवार, उपअभियंता ठमके, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी बी. एस. मरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिपक लिमसे, शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार, उपशिक्षणाधिकारी भोंगाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
खुल्या सैनिक भरतीसाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी भेट घेतली होती. त्यांना जिल्ह्यातील परिस्थिती समजावून सांगितली होती. संरक्षण मंत्र्यांनी याविषयी नागपूर विभागाच्या कर्नलकडे माहिती दिली. त्यानंतर जिल्ह्यात ६ जानेवारी पासून सैन्य भरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना याचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा, यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. सैन्य भरतीची माहिती गावागावापर्यंत पोहचण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.
- चरण वाघमारे,
आमदार, तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र
अशी राहील भरती प्रक्रिया
भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आॅनलाईन नोंदणी करावी लागेल. यामध्ये दिलेल्या पात्रतेनुसार उमेदवारांची निवड करुन त्यांना प्रवेशपत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल. यासाठी उमेदवारांचा ई-मेल आय.डी. आणि भ्रमणध्वनी क्रमांक आॅनलाईन नोंदणी करतांना देणे आवश्यक आहे. उमेदवारांची १.६ किलोमीटर धावण्याची परिक्षा घेण्यात येईल. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचे बायोमेट्रीक रजिस्ट्रेशन करण्यात येईल. त्यानंतर शारिरिक चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.
वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय सेना दलात प्रवेश मिळेल. यासाठी उमेदवारांनी आतापासून तयारी करावी, असे आवाहन कर्नल महेंद्रकुमार जोशी यांनी केले आहे.
त्याचबरोबर यामध्ये उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणार असून यामध्ये गैर मार्गाला कुठलाही वाव मिळणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. उमेदवार आॅनलाईन रजिस्ट्रेशन स्वत: संगणकावर, सेतु केंद्र तसेच कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जावून करु शकतील. राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक प्राप्त खेळाडू तसेच एन.सी.सी.मध्ये सी प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांसाठी आरक्षण राहणार आहे. अशी माहिती कर्नल महेंद्रकुमार जोशी यांनी दिली.

Web Title: District Selection for Military Recruitment Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.