रामभाऊंच्या निधनाने जिल्हा पोरका
By Admin | Updated: October 24, 2016 00:38 IST2016-10-24T00:38:14+5:302016-10-24T00:38:14+5:30
भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार रामभाऊ आस्वले यांचे रविवारला दुपारी ४ वाजता निधन झाले.

रामभाऊंच्या निधनाने जिल्हा पोरका
भंडारा : भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार रामभाऊ आस्वले यांचे रविवारला दुपारी ४ वाजता निधन झाले.
कुशल संघटक, वक्तशीरपणा, शब्दांचा पक्का असे एकाहून अनेक विशेषणे लाभलेल्या लोकनेत्याच्या निधनामुळे जिल्ह्यातील भाजप परिवार पोरका झाला आहे.
भंडारा विधानसभा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सन १९९० मध्ये ते भाजपच्या उमेदवारीवर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २००४ पर्यंत तीन सत्र ते आमदार राहिले. या १४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पक्ष संघटन वाढविले. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले रामभाऊ मितभाषी स्वभावाचे होते.
कुशल संघटकाला मुकलो -पटोले
राजकारणासोबत समाजकारण कसे करायचे याचा वस्तुपाठ रामभाऊंनी घालून दिला. काम करण्याची त्यांची हातोटी न विसरणारी आहे. माणसे कशी जपली पाहिजे, हा मंत्र त्यांच्याकडून शिकल्याची प्रतिक्रिया खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.
मित्र गमावला -कुकडे
रामभाऊंसोबत मी दहा वर्षे विधानसभेत काम केले. जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी कसा खेचून आणता येईल, हीच त्यांची तळमळ होती. त्यांच्या जाण्याने सच्चा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया माजी आमदार मधुकर कुकडे यांनी व्यक्त केली.
सामान्यांचा नेता - सुनिल फुंडे
जनसामान्यांच्या प्रश्नाला आपले प्रश्न समजून रामभाऊंनी हाताळले. जिल्ह्याच्या विकासासाठी ते कायम प्रयत्नरत राहिले. लोकांना आपलेसे करण्यात त्यांची हातोटी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल फुंडे यांनी व्यक्त केली.
मार्गदर्शक हरपला -वाघाये
राजकारणाचे बाळकडू रामभाऊंनी शिकविले. पक्ष कोणताही असला तरी ते सर्वांचे मार्गदर्शक राहिले. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक हरपला, अशी प्रतिक्रिया माजी आमदार सेवक वाघाये यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)