तर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस सुरक्षा नाकारावी
By Admin | Updated: September 1, 2015 00:26 IST2015-09-01T00:26:32+5:302015-09-01T00:26:32+5:30
जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेचा जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे, त्या पोलीस प्रशासनाच्या प्रमुखाला ‘युजलेस’ म्हणने चुकीचे आहे.

तर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस सुरक्षा नाकारावी
नरेंद्र भोंडेकर गरजले : लोकप्रतिनिधींनाही मिळते अपमानास्पद वागणूक
भंडारा : जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेचा जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे, त्या पोलीस प्रशासनाच्या प्रमुखाला ‘युजलेस’ म्हणने चुकीचे आहे. गृह विभाग युजलेस असेल तर त्यांचे पोलीसही युजलेस आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस सुरक्षाही घेऊ नये. अशा जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्ह्यातून हटविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.
यावेळी भोंडेकर म्हणाले, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत असताना एकाही शेतकऱ्यांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. पवनी येथे तहसील कार्यालयात झालेल्या घटनेनंतर जिल्हाधिकारी त्यांचे नेतृत्व करतात, ते जनतेची कामे करण्यासाठी आले की कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी आले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिना भरापूर्वी शहरात प्रीती पटेल या महिलेचा खून व अश्विनी शिंदे या तरुणीवर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींनाही अपमानास्पद वागणूक दिली.
जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कोणत्याही शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटावयाचे असेल तर पाच-सहा लोकांना परवानगी देण्यात येते. आणि स्वत: २५ लोकांना घेऊन पोलीस अधीक्षकांकडे जातात आणि त्यांच्याच कक्षात जावून त्यांना अपमानास्पद शब्दात बोलतात, आयपीएस नाही म्हणतात, असे बोलणे हे प्रमुख अधिकाऱ्यांना उचित ठरणारे नाही.
जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसेल तर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सुटणार कसे? या दोघांच्या वादामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. तीन दिवसाच्या लेखणी बंद आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला बसला.
जिल्ह्यात दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये अतिशय खालच्या स्तरावरचे भांडण सुरू असतानाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कुठे गेले आणि गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना ‘युजलेस’, तुम्ही ‘आयपीएस’ नाही असे म्हणून मनोबल खच्ची करीत असेल तर शिवसेना त्याचे कदापि समर्थन करणार नाही. अशा जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, यशवंत सोनकुसरे, अनिल गायधने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)