जिल्हा बँकेचे संचालक मंडळ कायम
By Admin | Updated: March 8, 2017 00:23 IST2017-03-08T00:23:22+5:302017-03-08T00:23:22+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य शासनाने केलेल्या प्रशासकाच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारला मंजूर केली.

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ कायम
न्यायालयाचा निर्णय : बँकेला सूचना न देताच नेमले होते प्रशासक
भंडारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य शासनाने केलेल्या प्रशासकाच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारला मंजूर केली. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यासह २१ सदस्यीय संचालक मंडळ पुढील निवडणुकीपर्यंत कायम राहणार आहे.
राज्य सरकारने १९ आॅक्टोबर २०१६ रोजी प्रशासकाची नियुक्ती केली होती. मे २०१६ मध्ये बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्ठात आला होता. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच जुन्या संचालक मंडळाने निवडणुकीची तयारी सुरू केली होती.राज्य सरकारने संचालक मंडळाला मुदतवाढ दिली होती. परंतु त्यावर काहींनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारने प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश दिला होता. त्यामुळे या बँकेवर जिल्हा उपनिबंधक संजय क्षीरसागर हे मागील १९ आॅक्टोबरच्या सायंकाळी ६.३० वाजतापासून प्रशासक म्हणून कार्यरत होते.
प्रशासकाची नियुक्ती करण्यापूर्वी बँकेला सूचना देण्याची गरज होती. परंतु सरकारने कोणतीही सूचना न देता प्रशासक नियुक्त केले होते. याचिकेत हा मुद्दा रेटून धरला होता. याच मुद्यावर न्यायालयाने याचिका मंजूर करीत जुन्या संचालक मंडळाला दिलासा दिला आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक संजय क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाला दुजोरा देऊन आदेश पाहून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या गोटात आनंद
भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्हा बँका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली. गोंदिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा तत्कालीन आमदार राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. राष्ट्रवादीचेच सुनिल फुंडे हे भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीची सूत्रे बँकेतून हाताळली जातील, या कारणामुळे राज्य सरकारने या दोन्ही जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा आदेश दिला होता. त्यानंतर या निवडणुकीत भाजपने रणनीती आखून परिणय फुके यांना निवडून आणले. अखेर ही बँक जुन्या संचालक मंडळाकडे परत आल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
सुनील फुंडे आज स्वीकारणार पदभार
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हे बुधवारला सकाळी ११ वाजता बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पुढील निवडणुकीपर्यंत ते आणि त्यांचे २१ सदस्यीय संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे.