जिल्ह्यात विषाणुजन्य तापाची साथ
By Admin | Updated: August 30, 2014 01:35 IST2014-08-30T01:35:36+5:302014-08-30T01:35:36+5:30
जिल्ह्यात विषाणुजन्य तापाची साथ पसरली असून शेकडो रूग्णांचे लोंढे उपचारार्थ जिल्हा सामाण्य रूग्णालयात येत आहेत.

जिल्ह्यात विषाणुजन्य तापाची साथ
भंडारा/मोहाडी/तुमसर/पालांदुर : जिल्ह्यात विषाणुजन्य तापाची साथ पसरली असून शेकडो रूग्णांचे लोंढे उपचारार्थ जिल्हा सामाण्य रूग्णालयात येत आहेत. यात सर्वाधिक रूग्ण हे डेंग्यूसदृश्य आजाराचे असल्याचे दिवसेंगणिक वैद्यकीय तपासणीअंती निष्पन्न होत आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागाची सुविधांअभावी चांगलीच गोची होत आहे.
औषधांचा अल्प पुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि स्वच्छतेचा अभाव या मुख्य कारणांमुळे रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी व साकोली तालुक्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य तथा उपकेंद्रात सुविधांचा अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
मोहाडी : या तालुक्यात तापाच्या आजाराने रौद्रा रूप घेतले आहे. आरोग्य विभाग मात्र गाफिल आहे. अशातच मोहगाव देवी येथील ११ वर्षीय बालकाचा डेंग्यू व ४५ वर्षीय महिलेचा मेंदूज्वराने मृत्यू झाला असला तरी यंत्रणा तत्पर झालेली नाही. या तालुक्यातील गावागावात तापाचे रूग्ण आढळत आहे. विषाणू स्वरूपात हा ताप असल्याचे वैद्यकीय विभागाचे अधिकारी सांगत आहेत. डेंग्यू सदृश्य रुग्ण मिळत आहेत, असेही अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. प्रत्यक्षात डेंग्यूचा आजार गावागावात फैलावत चालला आहे. कान्हळगाव, सिरसोली येथेही डेंग्युचे रुग्ण सापडले आहे.
मलेरिया तापाने ही रुग्णात दहशत पसरविली आहे. गावागावात तापाचे आजार बळावले आहे. खाजगी डॉक्टरांचे दवाखाने भरून चालले आहेत. गावात डॉक्टरांची चांगली चलती आहे. गावातील स्थानिक पंचायत आरोग्याच्या दृष्टीने काही करतानी दिसत नाही. आरोग्याची जबाबदारी घेण्याचे उत्तरदायीत्व ग्रामपंचायतचे आहे, असे असतानी नुसत्या पुरस्कारासाठी कागदे रंगविणारी ग्रामपंचायत गावाच्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे.
आज मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दररोज ३५० च्या वर रुग्ण तपासणीला येतात. दोन आठवडे झाले तापाने फणफणले रुग्ण जास्त बाह्य रुग्ण कक्षात येत असल्याची माहिती आहे.
आजपर्यंत मोहाडी ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूचा एक रुग्ण सापडला. तसेच मलेरिया, टाईफाईड याचेही पाझेटिव्ह रुग्ण मिळाल्याची माहिती आहे. केसलवाडा येथे पाच रुग्ण डेंग्यूचे आढळले. त्याच्यावर उपचार करण्यात आला. तसेच पालोरा येथील एका मुलीचे डेंग्यूने मृत्यू झाला होता.
तुमसर : तुमसर तालुक्यात डेंग्यूने थैमान घातल्याचे दिसून येत असून डेंग्युसदृश्य आजाराची लागण झाली आहे. शासकीय प्रयोगशाळा पूणे येथे पाठविलेल्या रक्ताच्या नमून्यात सात रुग्ण पॉझीटिव्ह आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. देव्हाडी, खापा तुमसर व बोरी येथे डेंग्यूचा प्रकोप जास्त आहे. या गावात उपाययोजना शुन्य दिसत आहे.
तुमसर तालुक्यात डेंग्यूची लागण सुमारे एक ते दीड महिन्यापूर्वी सुरू झाली होती. डेंग्यूसदृश्य आजार असल्याची पुष्टी खाजगी रुग्णालयाने केली.
मागील दीड महिन्यात १४० डेंग्यू सदृश्य रूग्ण असल्याची माहिती आहे. तालुक्यातील देव्हाडी, खापा, बोरी येथे डेंग्यूचा प्रकोप जास्त असल्याची माहिती आहे. या गावात डेंग्यूची लागण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कुरैशी यांनी सांगितले.
तालुक्यातून सात रुग्णाला डेंग्यू असल्याचे पूणे येथील प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला आहे. एका खाजगी पॅथालॉजीकडे आलेल्या रक्त् तपासणीत १४० मुलांना डेंग्यू सदृश्य आजार असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाने ते अमान्य केले आहे. तपासणी केल्यावरच डेंग्ूय असल्याचे अथवा नसल्याचे खरी माहिती मिळते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुमसर शहरात पाच मुलांना डेंग्यू असल्याचे कळते.
नगरपालिका प्रशासनाने फॉगींग सुरू केली असून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत उच्च दर्जाची औषधांचा फवारणी करणे सुरू आहे.
देव्हाडी येथे गांधी वॉर्डातील नंदीनी गिरीश शेंडे (१०) या मुलीला डेंग्यूची लागण झाली आहे. आरोग्य विभागाने देव्हाडीत अजूनपर्यंत उपाययोजना केली नाही. गावात आरोग्य तपासणी शिबिर लावण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीचे येथे दुर्लक्ष आहे. गावातील नाल्या तुडूंब कचऱ्याने भरलेल्या आहेत. स्वच्छतेची जनजागृती येथे ग्रामपंचायतीने केली नाही. सरपंच व उपसरपंच पायउतार झाल्याने गाव वाऱ्यावर सोडल्यासारखे आहे. मुलभूत बाबीकडे अक्षम्य येथे दुर्लक्ष दिसून येत आहे. पदाकरिता येथे रस्सीखेच सुरू आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ नावापुरतेच आहे. डेंग्यूचा उद्रेक होण्यापूर्वी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
(लोकमत न्युज नेटवर्क)