जिल्ह्यातील ५०४४ घरकूल अपूर्णावस्थेत
By Admin | Updated: July 18, 2016 01:33 IST2016-07-18T01:33:11+5:302016-07-18T01:33:11+5:30
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत मागील दहा वर्षापुर्वी घरकुल योजनेचा लाभप्राप्त जिल्ह्यातील सुमारे ५,०४४ लाभार्थ्यांची घरकुले ...

जिल्ह्यातील ५०४४ घरकूल अपूर्णावस्थेत
ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा ठपका : तीन महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याची तंबी
प्रमोद प्रधान लाखांदूर
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत मागील दहा वर्षापुर्वी घरकुल योजनेचा लाभप्राप्त जिल्ह्यातील सुमारे ५,०४४ लाभार्थ्यांची घरकुले अपूर्णावस्थेत असल्याचा ठपका थेट ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी ठेवला आहे. त्यानुसार अपूर्णावस्थेतील घरकुले केवळ तीन महिन्यात पूर्ण करण्याची तंबी देतांना लाभार्थ्यांनी उचल केलेला अग्रीम धनादेशाची फेरवसुली करतांनाच स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यासह फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत इंदिरा आवास, रमाई आवास आदी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबाना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र काही कुटूंबाना मंजूरी मिळताच बांधकाम प्रगतीनुसार अग्रीम धनादेश देखील प्रदान करण्यात आले होते. मात्र तब्बल १० वर्षापुर्वी घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांकरवी अग्रीम धनादेशाची उचल होवूनही हजारो घरकुले अपूर्णावस्थेतच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान काही लाभार्थ्यांनी अग्रीम धनादेशाची उचल करुन घरकुल बांधकाम सुरु न केल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.
संबंधित लाभार्थ्यांकडून उचल केलेल्या अग्रीम धनादेशची रक्कम वसुल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. निर्देशानुसार कोणी लाभार्थी उचल केलेल्या रक्कमेची फेरवसुली करतांना टाळाटाळ करीत असल्यास संबंधीतांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यासह फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे. दरम्यान पुरेशा निधीअभावी अनेक घरकुल लाभार्थ्यांकडे शौचालय नसल्याचे शासनाला आढळून आल्याने संबंधीत लाभार्थ्यांला स्वच्छ भारत अभियान अथवा मग्रारोहयो अंतर्गत शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निदे्रश देखील देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील बेघर गरीब कुटूंबाना मागील अनेक वर्षापासून घरकुलाचा लाभ चालविला आहे. शासन प्रशासन या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना ५ हजाराहून अधिक घरकुले अपूर्णावस्थेत असल्याचे आढळून येणे चिंताजनक ठरले असून सदर गैरप्रकारासाठी खुद्द लाभार्थ्यांची उदासिनता कारणीभूत आहे. दरम्यानच्या काळात लाभार्थ्यांची घरकुले अपूर्णावस्थेत आहेत. ती घरकुले शासन निर्देशानुसार तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
वासुदेव तोंडरे, उपसभापती, पंचायत समिती, लाखांदूर
पीएमएवाय अंतर्गत मिळणार लाभ
सन २०११च्या आर्थिक, सामाजिक व जातनिहाय सर्व्हेक्षणानुसार यावर्षीपासून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास आयोजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. सदर योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची नावे येत्या १५ आॅगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेतून प्रस्तावित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. सदर योजना शासनाने नव्याने कार्यान्वित करतांना यापूर्वी घरकुल योजनेपासून वंचित निर्विवाद लाभार्थ्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.