जिल्ह्यात दोन लाख एलईडी बल्बचे होणार वाटप
By Admin | Updated: February 6, 2016 00:35 IST2016-02-06T00:35:54+5:302016-02-06T00:35:54+5:30
विजेच्या बचतीसाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीकडून भंडारा जिल्ह्यात दोन लाख लोकांना एलईडी बल्बचे वितरण करणार आहे.

जिल्ह्यात दोन लाख एलईडी बल्बचे होणार वाटप
भंडारा : विजेच्या बचतीसाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीकडून भंडारा जिल्ह्यात दोन लाख लोकांना एलईडी बल्बचे वितरण करणार आहे. गुरूवारला मोहाडी येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. विजेची थकबाकी नसणाऱ्या ग्राहकांना विजेच्या महाबचतीसाठी एलईडी बल्बचे वितरण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत भंडारा जिल्ह्यात एलईडी बल्बचे वितरण महावितरण कंपनीच्या पुढाकाराने करण्यात आले. यात प्रत्येक ग्राहकाला १०० रूपयांप्रमाणे कमाल १०, किमान दोन बल्ब देण्यात येईल. सात वॅटचा एलईडी बल्ब हा सामान्य बल्बइतका प्रकाश देतो़. या बल्बने विजेची ८० टक्के बचत होते़ या योजनेअंतर्गत ४०० रूपयांचा एलईडी बल्ब ग्राहकांना केवळ १०० रूपयात वितरीत करण्यात येणार आहे़
सुलभ हफ्त्याने हे बल्ब हवे असल्यास १० रूपये रोख व ९ रूपयांच्या १० समान हफ्त्यात व शेवटच्या हफ्त्यात ५ रूपये असे १०५ रूपयात खरेदी करता येऊ शकणार आहे़ या बल्बवर तीन वर्षांची मोफत बदलून देण्याची वारंटी आहे़ हे बल्ब मिळण्यासाठी चालू भरलेले वीज बिलाची झेरॉक्स व ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड द्यावे लागणार आहे़ सुलभ हफ्त्याची सुट ही केवळ चार बल्बसाठी राहणार असून एका ग्राहकाला जास्तीत जास्त १० बल्ब खरेदी करता येऊ शकणार आहे. ऊर्वरीत सहा बल्ब १०० रूपये प्रति बल्बप्रमाणे देण्यात येईल.
या योजनेसंदर्भात बोलताना अधीक्षक अभियंता सुरेश मडावी म्हणाले, भंडारा जिल्ह्यात दोन लाखावर महावितरणच्या ग्राहकांची संख्या आहे. कनेक्शन वाढले तर ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या योजनेतंर्गत तालुकास्तरावर एलईडी बल्ब वितरण करण्यात येणार असून त्यानुसार बल्बचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
मोहाडीतून शुभारंभ
भंडारा जिल्ह्यात गुरुवारला मोहाडीत एलईडी बल्ब वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, एलईडी बल्बच्या वापराबाबत व ऊर्जाबचतीचे महत्त्व सांगुन सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे, उपाध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, पंचायत समिती सभापती हरीशचंद्र बंधाटे उपस्थित होते़ (जिल्हा प्रतिनिधी)