दूरसंचार विभागाने टाकली कात
By Admin | Updated: May 17, 2015 01:13 IST2015-05-17T01:13:30+5:302015-05-17T01:13:30+5:30
दूरसंचार क्षेत्रात सेवा देणाऱ्या अग्रक्रमापैकी भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) कात टाकली आहे.

दूरसंचार विभागाने टाकली कात
भंडारा : दूरसंचार क्षेत्रात सेवा देणाऱ्या अग्रक्रमापैकी भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) कात टाकली आहे. जिल्ह्यात २४ हजार ९८२ दूरध्वनी ग्राहक असून इंटरनेट व ४ जी सेवा कार्यान्वीत करण्याच्या बाबतीतही दूरसंचार विभागाने मोठी प्रगती केली आहे. आज दूरसंचार दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील बीएसएनएलसह खाजगी सेवा देणाऱ्या कंपन्यांचा हा उहापोह.
बीएसएनएलचे जिल्ह्यात इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या सात हजार ५३० आहे. बीएसएनएल भ्रमणध्वनी वापरणाऱ्यांची संख्या एक लक्ष १२ हजार ६२७ आहे. मनोऱ्यांची संख्या १७९ असून यापैकी २ जी व ३ जी
सुविधा देणाऱ्या प्रत्येकी ८ मनोऱ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
यापैकी ३ जी मनोरा साकोली, सेंदुरवाफा, देवरी, तिरोडा, लाखांदूर, आमगाव, अर्जुनी मोरगाव व पवनी येथे उभारण्यात येत आहे.
बीएसएनएलच्या भ्रमणध्वनी सेवेंतर्गत एसएमएस सर्व्हिसचा जिल्ह्यातील २० हजार १०८ ग्राहक लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे बीएसएनएलने काही दिवसांपुर्वीच रात्री ९ ते सकाळी ७ या कालावधीत दूरध्वनीहून कॉल करने नि:शुल्क केले आहेत. यात लॅन्डलाईन व मोबाईल सेवांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)
सहा महिन्यात ४ जी सेवा
जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यात इंटरनेट क्षेत्रात क्रांती होणार आहे. यात ४ जी सेवेचा समावेश करण्यात येणार असून यामुळे संगणकीय कामे व माहितीचे आदान प्रदान क्षणात करण्यात येण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. सध्यास्थितीत इंटरनेट ग्राहक जर त्यांचे बिल आॅनलाईन पद्धतीने भरत असतील तर त्यांना पुढील बिलामध्ये एक टक्का सुट देण्यात येते.