शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याने असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:22+5:302021-07-24T04:21:22+5:30
भंडारा जिल्ह्यातील खाजगी व जिल्हा परिषदेतील उच्च माध्यमिक शिक्षक यांचे वेतन गत अनेक महिन्यापासून अनियमित होत आहे. त्यामुळे त्यामुळे ...

शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याने असंतोष
भंडारा जिल्ह्यातील खाजगी व जिल्हा परिषदेतील उच्च माध्यमिक शिक्षक यांचे वेतन गत अनेक महिन्यापासून अनियमित होत आहे. त्यामुळे त्यामुळे अनेक शिक्षकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षकांना एक तारखेला वेतन देण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक विभाग भंडारा तसेच शिक्षणाधिकारी भंडारा यांच्या वेळकाढूपणामुळे उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन वेळेवर मिळत नाही. अनेक शिक्षकांनी कर्ज काढले आहे. त्यांना कर्जाची किस्त वेळेवर न भरल्यास अतिरिक्त व्याज भरून द्यावा लागतो. उच्च माध्यमिक विभागाचे अनुदान नसल्याचे कारण देत वेतन वेळेवर होत नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पण उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन का वेळेवर होत नाही? असा प्रश्न विजुक्टा यांच्यातर्फे उठविण्यात आला आहे. या महिन्याचे शेवटचे पाच दिवस शिल्लक असूनही शिक्षकांना वेतन मिळाले नाही. हे नेहमीचे झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षकांची संघटना विजुक्टातर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची भेट घेतली असता त्यांनी शिक्षकांचे वेतन बिल ट्रेझरी ला १७ जुलैला गेले असल्याचे सांगितले. ट्रेझरीत पडून आहेत. पण असे हे नित्याचे झाले आहे. या सर्व प्रकारामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले, तसेच लॉकडाऊन काळात ड्युटी करतांना आजारी पडले. अनेकांनी नवीन घर बांधण्यासाठी फ्लॅट खरेदी केले. यासाठी भविष्य निर्वाह निधी रकमेच्या उचल करण्यासाठी प्रस्ताव तयार केले. परंतु गत चार-पाच महिन्यांपासून भविष्य निर्वाह निधी रकमेचे बीडीएस निघत नसल्याने शिक्षकांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळत नाही. उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन दर महिन्याला पाच तारखेच्या आत करण्यात यावे, तसेच भविष्य निर्वाह निधीची नापरतावा रक्कम त्वरित मिळण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा विजुक्टा अध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने, सचिव प्रा.राजेंद्र डोनाडकर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत न झाल्यास या विरोधात भंडारा जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.