येरली पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 00:47 IST2016-03-04T00:47:09+5:302016-03-04T00:47:09+5:30
थकीत वीज देयकापोटी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज पुरवठा तीन दिवसापुर्वी खंडीत करण्यात आला.

येरली पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत
दोन लाखांचा वीज देयक : दूषित पाणी पिण्यास बाध्य
तुमसर : थकीत वीज देयकापोटी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज पुरवठा तीन दिवसापुर्वी खंडीत करण्यात आला. आठ गावांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा या योनेअंतर्गत करण्यात येत होते. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने ही योजना जिल्हा परिषदेला दोन वर्षापुर्वी हस्तांतरीत केली होती. या योजनेवर सुमारे दोन लक्षाचा वीज देयक थकीत आहे.
तुमसर तालुक्यातील येरली येथे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने पाच वर्षापुर्वी तीन कोटी रूपये खर्च करून आठ गावांकरीता पाणीपुरवठा योजना तयार केली होती. ही योजना चालविण्याकरिता जीवन प्राधीकरण इच्छुक नव्हते. राजेश पटले यांनी शिखर समिती स्थापन केली होती. या समितीचे सदस्य म्हणून पंचायत समिती, सदस्य हिरालाल नागपूर सह इतर सदस्य होते. मागील दोन ते अडीचवर्षे ही योजना सुरळीत सुरू होती. दोन वर्षापासून या योजनचे दोन लक्ष रूपयांचे वीज बिल थकीत होते. मुख्य अभियंत्यांनी तीन दिवसापुर्वी या योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश सिहोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना दिला. त्या अनुषंगाने सदर योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.
येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येरली, मोहगाव, सिलेगाव, हरदोली, कर्कापूर, तामसवाडी सि. रणेरा, डोंगरला ही गावे येतात. सुमारे १२ ते १४ हजार नागरिकांना ही योजना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करते. मागील तीन दिवसापासून येथे नागरिकांना विहीरींचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाणी शिखर समिती सदस्य व संबंधित गावातील ग्रामपंचायत नागरिकांकडून पाणी कर वसुल करून ही योजना चालवित होती. शासनाचा अनुदान येथे मिळत नव्हते. जिल्ह्यातील एकमेव सुरळीत सुरू असणारी ही योजना होती. तिलाही आता ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने कोट्यवधींचा निधी खर्च करून योजना तयार केल्या. परंतु त्या चालवायच्या कुणी याचा पत्ता नसल्याने योजना भंगारात निघाल्या आहेत.
- एन.एच. झलके, कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी सिहोरा
दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडे पैसा नाही त्यामुळे पाणी कर गोळा झाला नाही. जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाली. पदाधिकाऱ्यांनी येथे निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- हिरालाल नागपूरे, गटनेता पंचायत समिती तुमसर.