वरठी : विधानसभेसाठी होणारे मतदानाला दहा दिवस शिल्लक आहेत. परंतु, तुमसर विधानसभा क्षेत्रातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे अद्याप अस्पष्ट आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पाहिजे तेवढा उत्साह नाही. यावेळी राजयोग घेऊन मैदानात उतरलेल्या पक्षांना येथील मतदार जाब विचाण्याच्या तयारीत आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांना बंडखोरीचा फटका बसणार आहे. भाजपमध्ये विद्यमान उमेदवार विजयी झाल्यास तो सर्वांना फिरवणार याची धुसफूस सुरू आहे. माजी आमदार अनिल बावनकर यांची भुमिका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत या क्षेत्रात राष्ट्रीय पक्षाच्या विरोध वाढत आहे. भाजपचे चरण वाघमारे यांनी मोठा विरोध झुगारून तर काँग्रेसचे प्रमोद तितीरमारे यांनी विद्यमान आमदारांची तिकीट कापून उमेदवारी मिळविली. भाजपचे माजी आमदार मधुकर कुकडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची घड्याळ हाताला बांधली. किसान गर्जनाचे राजेंद्र पटले यांचे पक्षातील स्थान अनेक दिवसापासून अस्थिर होते. हो नाही म्हणत त्यांनी शिवधनुष्य उचलले आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार हे सर्वपरीचित व राजकीय क्षेत्रातून आले आहेत. पक्षाची उमेदवारी एकाला मिळाल्यामुळे अन्य दावेदार नाराज होतात. निवडणुकानंतर वरिष्ठ नेते पुढाकार घेऊन मनोमिलन घडवून आणतात. परंतु, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षात मनोमिलन घडण्याचे दिसत नाही. भाजपचे उमेदवार चरण वाघमारे यांच्या विरोधात भाजपचा मोठा गट होता. गटागटाच्या प्रक्रियेत सर्व गट मधुकर कुकडे यांना उमेदवारी मिळाल्यास काम करण्यासाठी तयार होते. परंतु चरण वाघमारे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे एकाकी पडल्याचे दिसते. एकहाती कारभार चालवतात व इतरांना डावलतात, असा भाजपातीलच कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर आरोप आहे. आता ते विजयी झाले तर सहजासहजी मैदान सोडणार नाही. पुढील काळात इतरांना संधी मिळणार नाही, यासाठी भाजपचा मोठा गट त्यांच्या विरोधात आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तितीरमारे यांना वडिलोपार्जीत राजकीय वारसा मिळाला असला तरी तो वारसा अनुकूल नाही. २००९ च्या निवडणुकीत ऐनवेळेवर बावनकरांनी त्यांची तिकीट कापली होती. यावेळी त्यांनीही तेच केले. परंतु यावेळी बावनकर यांचे प्रस्थ असल्यामुळे मोहाडी व तुमसर तालुक्यात त्यांचा गट सक्रीय आहे. तितीरमारे यांची तुमसर शहराबाहेर फारशी ओळख नाही. बावनकर यांच्या भूमिकेवर त्यांची मदार आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात पक्षात वजनदार नेते नाही. पक्षात मोठे असलेल्या नेत्यांचा जनाधार नाही, अशी परिस्थिती आहे. कुकडे हे तीनदा आमदार राहिल्यानंतर मागील निवडणुकीत बावनकर निवडून आले. यावेळीही पुन्हा अपेक्षा केली, पक्षाने तिकीट कापली. त्यांना राष्ट्रवादी आठवली. फिटवण्यासाठी उमेदवारी दिली, अशी चर्चा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या रॅलीत उडी घेतली. शिवसेनेचे राजेंद्र पटले यांच्या समांतर संघटनेमुळे कार्यकर्त्यांची फळी नाही. किसान गर्जना नंतर भाजप व आता शिवसेना यामुळे त्यांना मतदाराचा कौल किती मिळणार हे सांगता येत नाही. सध्या ते एकटेच गावागावात फिरत आहेत. युतीच्या काळात शिवसेनेची ताकद दिसली नव्हती. सध्याच्या राजकीय समीकरणात तुमसर विधानसभा क्षेत्रात कोण बाजी मारणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. जातीय समीकरणाच्या आधारावर मतांचे विभाजन होणार असले तरी लोकसभा निवडणुकीची लाट निष्प्रभ ठरण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)
उमेदवारांना बसणार असंतुष्टांचा फटका
By admin | Updated: October 6, 2014 23:08 IST