शिक्षण आयुक्तांशी कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची चर्चा
By Admin | Updated: August 6, 2016 00:33 IST2016-08-06T00:33:53+5:302016-08-06T00:33:53+5:30
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची बैठक शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली.

शिक्षण आयुक्तांशी कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची चर्चा
भंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची बैठक शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली.
या बैठकीमध्ये शिक्षण संचालक एन. के. जरग, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, सहसंचालक आयुक्त सुनिल चव्हाण, संघटनेचे पदाधिकारी सुर्यकांत हुमणे, विनय सुदामे शैलेश जांभुळकर, डॉ. मधुकर रंगारी, प्रा. मधुकर रुसेश्वरी, राजेंद्र कांबळे, कविता मडावी, प्रा. गौतम मगरे, डॉ. हरिश्चंद्र रामटेके, विनय शेवाळे, संजय सायरे, नरेंद्र भोयर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधीत शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हितसंबंधी २९ मागण्या सभेमध्ये ठेवण्यात आल्या. त्यामध्ये वेतन १ ते १० तारखेपर्यंत देण्यात यावे, शिक्षकांना नियमित वेतनवाढ देण्यात यावी, नियमाप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, शिक्षकांना समायोजीत करण्यात यावे, अशैक्षणिक कामे जनगणना, निवडणुक, संडास, बाथरुम, साफसफाई, बांधकाम, औषध वाटप, डेंग्यु आजार इत्यादी कामे देण्यात येवू नये, फक्त शैक्षणिक कामे देण्यात यावी, भौतिक सुविधा देण्यात याव्यात, आॅनलाईन तांत्रिक कामात सुट देण्यात यावी, रोस्टरनुसार पदभरती करण्यात यावी, खाजगी संस्था संचालकांचे नियमबाह्य धोरण केंद्रप्रमुखाचे अप्राप्त भत्ते व अतिरिक्त कामे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे, शिक्षकांना अपडेट शैक्षणिक माहिती देण्यात यावी, शिक्षकांच्या बदल्या प्रकरणी स्पष्ट धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी. खाजगी शाळेच्या संचालकाचे अस्पष्ट धोरण, खाजगी शिक्षकांच्या अडचणी दुर करण्यात याव्या, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देण्यात यावी, शिक्षकांना १ नोव्हेंबर २००५ पुर्वी शासन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस ची कपात झालेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना नैमीत्तिक रजा तसेच संघटनेतील केंद्रीय, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना बदली प्रकरणी सवलत देण्यात यावी, शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी लिपिक, शिपाई, संचालक, उपसंचालक कार्यालयात रिक्त पदावर संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित पदभरती करण्यात यावी व इतर मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. त्वरित संपूर्ण प्रश्न निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी कास्ट्राईब संघटनेला दिली.
कार्यवाहीसाठी शिक्षणआयुक्त धीरजकुमार यांनी संचालकांना आदेश दिलेत. पदाधिकाऱ्यांना १० दिवसांच्या नैमित्तिक रजा देण्यात याव्या.
संघटनेच्या एक प्रतिनिधी जिल्हास्तरावर मागासवर्ग कक्ष निवड समितीमध्ये नियुक्त करण्यात यावा, असा आदेश दिला. (नगर प्रतिनिधी)