सोंड्याटोला प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत
By Admin | Updated: November 26, 2015 00:33 IST2015-11-26T00:33:59+5:302015-11-26T00:33:59+5:30
महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या दीड महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत आहे. या प्रकल्पस्थळात सुरक्षा गार्ड अंधारात निगराणी ठेवत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.

सोंड्याटोला प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत
पाण्याचा उपसा बंद : उन्हाळी धानाचे पीक वांद्यात, लोकप्रतिनिधींवर रोष
चुल्हाड : महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या दीड महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत आहे. या प्रकल्पस्थळात सुरक्षा गार्ड अंधारात निगराणी ठेवत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
वीज वितरण कंपनीचे खरीप हंगामातील ३४ लाखांचे विजेचे देयके थकल्याने प्रकल्प स्थळात गेल्या महिन्यात सात तारखेला वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. प्रकल्पस्थळात या कालावधीत पाण्याचा उपसा थांबल्याने पुढील वर्षात घेण्यात येणारे उन्हाळी धानाचे पीक अडचणीत आले आहे. लोकप्रतिनिधी तथा सरकारच्या निष्क्रिय धोरणाचा फटका सिहोरा परिसरातील शेतीला बसणार आहे. ऐन खरीप हंगामात बावनथडी नदी पात्रात पाणी दुथडी भरून वाहत असताना पंपगृह विलंबाने सुरु करण्यात आला होता. यामुळे चांदपूर जलाशयाला ओव्हरफ्लो करता आले नाही. यामुळे जलाशयात अंतीम क्षणापर्यंत २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली होती. या पाण्यामुळे सिहोरा परिसरात १२ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यात यश आले. प्रकल्पस्थळात ९ पंपगृह असताना अखेरपर्यंत २ पंपगृह नादुरुस्त ठेवण्यात आले आहे. यामुळे अतिरिक्त पाण्याचा उपसा करण्यात आलेला नाही. प्रकल्पस्थळात सुरुवातीपासून ठिकठाक नसल्याची माहिती अस्थायी कामगारांनी दिली होती. परंतु लोकप्रतिनिधी तथा यंत्रणेमार्फत गांभीर्याने घेण्यात आले नाही. नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निधी नसल्याची बोंबाबोंब करीत होती. पंपगृह पाण्याचा उपसा करीत असताना शासन स्तरावर निधीची जुळवाजुळव करण्यात आली नाही. महिनाभर पंपगृहाने पाण्याचा उपसा केल्यानंतर विजेचे देयक थकविल्याचे कारणावरून वीज पुरवठा खंडीत करण्यात कारवाई करण्यात आली आहे. यामुळे १५ दिवस निरंतर उपसा करण्यात येणारा इतका पाणी नदीपात्रात वाहून गेला आहे. यामुळे या संकटात पाण्याची साठवणूक करता आली नाही. वीज पुरवठा सुरु करण्यासाठी उपविभागीय अभियंता पी.एन. लांजेवार यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत तडजोडीतून मार्ग काढण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला आहे. पाच टप्प्यात विजेचे देयके जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु हे प्रयत्न फिस्कटल्याची बाब निदर्शनास आली आहे. २० दिवस आधी करण्यात आलेले या चर्चेचे फलीत प्रकल्प स्थळात दिसून आले नाही. (वार्ताहर)