शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांना शिस्तभंगाची नोटीस
By Admin | Updated: June 12, 2017 00:26 IST2017-06-12T00:26:28+5:302017-06-12T00:26:28+5:30
आंतरजिल्हा बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून भंडारा येथील ११७ बदल्या रद्द केल्या होत्या.

शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांना शिस्तभंगाची नोटीस
प्रकरण आंतरजिल्हा बदलीचे : आज सीर्इंओकडे अहवाल
प्रशांत देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंतरजिल्हा बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून भंडारा येथील ११७ बदल्या रद्द केल्या होत्या. यात अनियमितता करणाऱ्यांमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांचा सहभाग असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या अनुषंगाने आयुक्त अनुपकुमार यांनी नोटीस बजावली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत ‘लोकमत’ने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील अनियमितेबाबत वृत्तमालिका चालविली होती. या बदली प्रक्रियेची दखल घेऊन आयुक्त अनुपकुमार यांनी दोषी आढळलेल्या पाच जणांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथ.) अभयसिंग परिहार, कक्षाधिकारी नलिनी डोंगरे, अधिक्षक रामभाऊ तरोणे, वरिष्ठ सहायक सुरेश येवले, वरिष्ठ सहायक तथा जि.प. उपाध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक मनिष वहाणे यांचा समावेश आहे. जि.प. शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली होती. यात त्यांनी ११७ बदल्या केल्या. बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आला असून बदलीचे निकष डावलण्यात आल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला होता. याची दखल घेत आयुक्त अनुपकुमार यांनी याची समितीमार्फत चौकशी केली. यात अनियमितता झाल्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला. आयुक्तांनी जिल्हा परिषदमधील ११७ पैकी न्यायालयात दाद मागणाऱ्या ६ शिक्षकांना वगळून अन्य ११६ बदल्या रद्द केल्या होत्या.
आयुक्तांचे शिस्तभंग नोटीस जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. आयुक्तांच्या नोटीसबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी शिक्षण विभागाला तात्काळ अहवाल मागितला आहे. दुसरा शनिवार व रविवार हे सुटीचे दिवस असतानाही उपशिक्षणाधिकारी चोले यांनी कार्यालयात बसून अहवाल तयार केल्याचे समजते. सीईओ यांच्याकडे शिस्तभंगाच्या कारवाईबाबतचा अहवाल सोमवारी सादर करण्यात येत असून बदली प्रक्रियेत दोषी आढळून आलेल्या पाच जणांवर काय कारवाई करतात याकडे नजरा लागल्या आहेत.
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पाच जणांना दोषी पकडून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येईल.
- मोहन चोले,
उप शिक्षणाधिकारी, (प्राथ.) भंडारा.