शासनाकडून अपेक्षाभंग
By Admin | Updated: May 11, 2015 00:19 IST2015-05-11T00:19:44+5:302015-05-11T00:19:44+5:30
मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली.

शासनाकडून अपेक्षाभंग
प्रफुल पटेल : मोर्चातून करणार निषेध
भंडारा : मोदी सरकारने वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मात्र या वर्षभरात सामान्य लोकांच्या पदरी निराशा आली. अन्न, वस्त्र, निवारा यासह बेरोजगारीमध्येही प्रचंड तुट निर्माण झाली. म्हणून शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या अपेक्षा संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येईल. या आशयाची माहिती माजी केंद्रीय उद्योगमंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी आज सायंकाळी ५.३० वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जयंत वैरागडे आदी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले धान उत्पादक शेतकरी धानाला भाव नसल्याने प्रचंड खचला आहे. संपुआ सरकारने बोनस देवून शेतकऱ्यांना आधार दिला होता. मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडची पाने पुसण्यात आली.
ऊसाचे चुकारेही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. वाढती महागाई, मजुरी यामुळे शेतकरी पूरता खचला आहे. खतांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन मिळालेले नाही.
केरोसिनच्या कोटयात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करुन जनसामान्यांना सोडले आहे. तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला प्रकल्पाचे विद्युत बिल न भरल्यामुळे ४२ गावांना या हंगामात सिंचन करता आले नाही. भारनियमनाची समस्याही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. यासह अन्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असेही खा. पटेल यांनी सांगितले. या मोर्च्यात शेतकऱ्यांसह सर्वांनीच सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)