वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार
By Admin | Updated: April 1, 2015 00:36 IST2015-04-01T00:36:12+5:302015-04-01T00:36:12+5:30
शिक्षण विभागाच्या बेफिकीर वृत्तीमुळे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना मागील चार वर्षापासून शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही.

वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार
राजू बांते मोहाडी
शिक्षण विभागाच्या बेफिकीर वृत्तीमुळे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना मागील चार वर्षापासून शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय पुणे यांच्या पत्रान्वये वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक परीक्षा २०१०, २०११, २०१२ व २०१३ या चार वर्षापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत ठरलेल्या जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही.
त्यात माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीमध्ये २०१० मध्ये भंडारा तालुक्यातील ५ विद्यार्थी, २०११ मध्ये ११, २०१२ मध्ये ५ व २०१३ मध्ये २८, लाखनी तालुक्यातील २०११ मध्ये एक विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातील २०१३ मध्ये एक विद्यार्थी, साकोली तालुक्यातील २०११ मध्ये एक विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातील २०१३ मध्ये एक विद्यार्थी, साकोली तालुक्यातील २०११ मध्ये एक विद्यार्थी व २०१३ या वर्षी २ विद्यार्थी तसेच तुमसर तालुक्यातील २०१० या वर्षी एक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिला आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेमधील भंडारा तालुक्यातील २०१० मध्ये ३, २०११ मध्ये ९, २०१२ मध्ये ६ व २०१३ म ध्ये ९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. लाखांदूर तालुक्यातील २०१० मध्ये ३, २०११ मध्ये २, २०१२ मध्ये १, मोहाडी तालुक्यातील २०१२ मध्ये १ विद्यार्थी, साकोली तालुक्यातील २०१० साली ४ विद्यार्थी तर तुमसर तालुक्यातील २०१० मध्ये १ व २०१२ मध्ये ३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून लांब राहावे लागले आहे.
माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेतील जिल्ह्यातील ५९ व पूर्व माध्यमिक योजनेतील ४३ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली नाही. चार वर्षापासून शिक्षण संचालनालयाला जाग आली आहे.
शिक्षणाधिकारी भंडारा यांना शिक्षण संचालक, पुणे यांनी २७ मार्च रोजी पाठविलेल्या पत्रान्वये आता शिष्यवृत्ती प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांची बँक खात्याची माहिती तात्काळ आॅनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा बँक खाते, पालकांचा आधार कार्ड याबाबत माहिती तात्काळ भरावयाची आहे. त्यामुळे चार वर्ष शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करणारे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना २०१४-२०१५ च्या परीक्षेचा निकाल परिषदेने जाहीर केलेला आहे.