गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्त पॅकेजपासून वंचित
By Admin | Updated: August 1, 2016 00:21 IST2016-08-01T00:21:35+5:302016-08-01T00:21:35+5:30
जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला.

गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्त पॅकेजपासून वंचित
पॅकेज देण्यास दिरंगाई : गोसीखुर्द पुनर्वसन विभागाचे दुर्लक्ष
भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. ज्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन घरदार बहाल केले, गोसेखुर्द प्रकल्पाला आज २५ वर्षे होऊन गेले. परंतु प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुखले नाही. उलट समस्याच वाढत आहे.
अशातच खैरी (सालेबर्डी) येथील गावठाण बाहेरील ६० कुटुंबांना अजूनही पुनर्वसन पॅकेज मिळाले नाही. याकडे गोसेखुर्द विभागाचे व जिल्हा प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबे रोज जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन संबंधित विभागात रोज चकारा मारत आहेत. परंतु त्यांना अजूनही पॅकेज मिळाले नसून, संबंधित विभागाविरुद्ध प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे.
खैरी (सालेबर्डी) येथील गावठाणाबाहेरील ६० घरे भूसंपादन प्रकरणात संपादित करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत गावठाण बाहेरील ते ६० कुटुंबे अजूनही पॅकेज पासून वंचित आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
खैरी या गावाचे पुनर्वसन अशोकनगर (फुलमोगरा) या नियोजितस्थळी युद्धपातळीवर काम सुरु आहे. काही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास गेली. त्याचप्रमाणे गावठाणाबाहेरील ६० घरांना सुद्धा भूखंड, मोबदला सुद्धा मिळाला आहे. सदर कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसन करण्याच्या तयारीत असतानासुद्धा गोसेखुर्द पुनर्वसन विभाग या ६० कुटुंबांना पॅकेज देण्यास दिरंगाई करीत आहे. तसेच या कुटुंबांनी पुनर्वसन ठिकाणी बांधकामास सुरुवात सुद्धा केलेली व तुटपूंज्या मोबदला देऊन त्यांचे बांधकाम अर्धवट आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना जर प्रशासनाने पॅकेज दिले तर त्यांचे घरांचे बांधकाम पूर्णत्वास येण्यास मदत होईल.
सदर कुटुंबाची जुनी घरे मोडकळीस आले आहेत. दरवर्षी घरांची दुरुस्ती करून नाकीनऊ आले आहे. जीव मुठीत घेऊन ही कुटुंबे मोडक्या घरात वास्तव करीत आहे. तरी संबंधित विभाग व प्रशासनाने या ६० कुटुंबांना लवकरात लवकर पॅकेज देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)