‘डर्टी वॉटर’मुळे आरोग्य धोक्यात

By Admin | Updated: November 24, 2014 22:52 IST2014-11-24T22:52:36+5:302014-11-24T22:52:36+5:30

लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली येथे जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. ही योजना पुर्णत्वास आली असली

'Dirty water' leads to health hazards | ‘डर्टी वॉटर’मुळे आरोग्य धोक्यात

‘डर्टी वॉटर’मुळे आरोग्य धोक्यात

संजय साठवणे - साकोली
लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली येथे जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. ही योजना पुर्णत्वास आली असली तरी जिल्हा परिषदेच्या हस्तांतरणाशिवाय जुलै महिन्यापासून ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे साकोली व लाखनी तालुक्यातील नागरिकांना ‘डर्टी वॉटर’ प्यावे लागत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा धोका बळावला आहे.
साकोली व लाखनी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसाठी राज्य शासनाने २०.५७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. यात जलशुध्दीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने दहा वर्षापुर्वी बांधकाम करण्यात आलेल्या व ‘हुडको’च्या अर्थसहाय्याने या जलशुध्दीकरण केंद्राचे काम पुर्ण करण्यात आले.
या योजनेअंतर्गत साकोली तालुक्यातील साकोली, जांभळी, शिवनीबांध, खंडाळा, सावरबांध, पिंडकेपार, बोदरा, सेंदुरवाफा तर लाखनी तालुक्यातील पोहरा, लाखोरी, पिंपळगाव, मानेगाव, पेंढरी, गडेगाव, साखरी, सोमलवाडा, गोंडसावरी व रेंगेपार अशा १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या योजनेला दररोज पाणीसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर तयार होणाऱ्या निम्न चुलबंद प्रकल्पाचा आसरा घेण्यात आला. मात्र या प्रकल्पालाही पुर्ण होण्यासाठी भरपुर काळ लोटला. मागीलवर्षी या प्रकल्पाचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे ही जलशुध्दीकरण योजना सुरू करण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ््यातच पाणीसाठा संपल्याने ही योजना पाण्याअभावी बंद पडली होती. यानंतर पावसाळ््यात पुन्हा पाणी अडविण्यात आले. शुध्द पाणी मिळेल, असे लोकांना वाटले परंतु अपेक्षाभंग झाला. ही योजना पाच महिन्यापासून बंद आहे.

Web Title: 'Dirty water' leads to health hazards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.