डंका निर्मलग्रामचा ; गावात मात्र अस्वच्छता
By Admin | Updated: November 11, 2014 22:34 IST2014-11-11T22:34:41+5:302014-11-11T22:34:41+5:30
शासनाद्वारे गाव स्वच्छ बनविण्यासाठी प्रती वर्ष अरबो रुपये खर्च केले जात आहेत. तथापि वास्तविकता विपरीत आहे. जी गाव निर्मल झाली. ती गाव कागदावर नावारुपाला आली आहेत.

डंका निर्मलग्रामचा ; गावात मात्र अस्वच्छता
राजू बांते - मोहाडी
शासनाद्वारे गाव स्वच्छ बनविण्यासाठी प्रती वर्ष अरबो रुपये खर्च केले जात आहेत. तथापि वास्तविकता विपरीत आहे. जी गाव निर्मल झाली. ती गाव कागदावर नावारुपाला आली आहेत. गावात प्रवेश करताना अशा निर्मल गावांची अनुभूती यायला लागते.
निर्मल गाव कशाला म्हणायचे या बाबीवर एक नजर घातली तर गावांना निर्मल ग्राम कसे पुरस्कार दिले गेले याचे आश्चर्य वाटायला नक्कीच लागेल. गावाला निर्मल गावाचा दर्जा देताना, सार्वजनिक ठिकाण शौचरहित असावे, सर्व कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा असावी, सर्व शाळांमध्ये मुला- मुलींसाठी वेगवेगळे शौचालय व मुत्रालय असावे, आंगणवाडी केंद्रात बालकांच्या उपयोगासाठी शौचालय असावे, शौचालयाचा नियमित उपयोग केला जावा, गावात पर्यावरण स्वच्छता हवी, गावात शंभर टक्के शौचालय असावेत व स्वच्छ पिण्याची पाणी उपलब्ध झाले या अटीवर निर्मलग्राम करण्यात आले. तथापि मोहाडी तालुक्यातील ७७ गावाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता निर्मल झालेली व न झालेल्या गावात शौचालयाची कमतरता असल्याचे दिसून येते.
आज निर्मल ग्राम योजनेला आठ वर्षाचा काळ झाला असताना अजूनही वास्तविकतेच्या आधारावर एकही निर्मल गाव असल्याचे कुठेच दिसून येत नाही. पुरस्कारावर शासनाचा लाखो अरबो रुपया वाया गेला. गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणले. गाव खेड्यात गावातील रस्त्यावर मानवी विष्ठेची दुर्गंधी नेहमीच दिसून येते. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानही गावात कागदावर राबविला जातो. केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १४ नोव्हेंबर बालक दिन ते १९ नोव्हेंबर जागतिक स्वच्छता गृह दिन राबविली जाणार आहे.
या मोहीमेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून स्वच्छ भारत हे ध्येय १०१९ पर्यंत साध्य करायचे आहे. ही मोहीम केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. कामकाज न करणाऱ्या व आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मोहाडी तालुक्यातील ७७ गावांपैकी ५३ गावे निर्मलग्राम झाली आहेत. २०१२ च्या सर्व्हेक्षणानुसार ५३ निर्मल गावात २३,६८४ घरे आहेत. त्यात आजही १० हजार ८८ घरी शौचालय नाहीत. २३ हजार ६८४ घरापैकी १३ हजार ५९६ घरी शौचालयाची व्यवस्था आहे. अजूनही २४ गावे निर्मलग्राम होण्याची प्रतिक्षा बघत आहेत. निर्मलग्राम न झालेल्या २४ गावात ४ हजार ६८९ शौचालय आहेत. अजूनही ९ हजार ९११ कुटुंबापैकी ५ हजार २२२ घरी शौचायल नसल्याची आकडेवारी आहे. जिल्हा परिषद शाळांचेही तेच हाल आहेत. नव्याने ६१ स्वच्छतागृहे बांधायची आहेत. यात पुन्हा २२ स्वच्छतागृहाची दुरुस्ती करायची आहे. जिल्हा परिषद शाळांची संख्या १०७ आहे. या १०७ शाळांमध्ये २३६ स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये परिचर पद नाही. त्यामुळे स्वच्छता करण्याचे काम विद्यार्थ्यांकडून केले जातात. काही शाळा मुख्याध्यापक शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांकडून झाडझूड करून घेतात. बऱ्याच प्राथमिक शाळात पाणी भरण्याचेही काम विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. बालकांकडून संस्कार मुल्यांच्या जोपासण्याच्या नावाखाली वर्षभर झाडझूड, पाणी भरण्याचे कार्य करणे योग्य नाही अशी पालकांची ओरड आहे.