दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

By Admin | Updated: November 15, 2014 22:42 IST2014-11-15T22:42:43+5:302014-11-15T22:42:43+5:30

शासनाच्या दुर्लक्षामुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे तीन तेरा वाजले असून पशुपालकांना नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांकडून महागडी सेवा घ्यावी लागत आहे.

Dighori Veterinary Clinic in the Wind | दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

दिघोरी (मोठी) : शासनाच्या दुर्लक्षामुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे तीन तेरा वाजले असून पशुपालकांना नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांकडून महागडी सेवा घ्यावी लागत आहे.
दिघोरी मोठी येथील लोकसंख्या ५-६ हजाराच्या घरात असून बहुसंख्य जनतेची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बऱ्याचवेळा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीलाजोडधंदा म्हणून येथील शेतकऱ्यांनी पशुपालनाला सुरुवात केली. मात्र मागील २५ जून २०१३ रोजी पासून येथील कार्यरत डॉ.राठोड यांची बदली झाली तर चपराशी निवृत्त झाल्यानंतर आजपावेतो दिघोरी पशुदवाखाना कायमस्वरुपी डॉक्टर मिळाले नाही. पशुपालकांना आपल्या जनावरांचे उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.
येथील कार्यरत डॉक्टर राठोड यांचे बदलीनंतर जवळपास ६ महिने लाखांदूर येथील डॉक्टर खुणे यांनी आठवड्यातून दिघोरी दवाखान्यात दोन दिवस सेवा देणे सुरु केले. त्यानंतरची सहा महिने डॉक्टरविना दवाखाना अशी ख्याती दिघोरी पशुदवाखान्याला प्राप्त झाली व नंतरचे सहा महिने सानगडी येथील महिला डॉक्टर आठवड्यातून दोन दिवस दिघोरीतच्या पशुदवाखान्याला सेवा देत आहेत. मात्र आठवड्यातील उर्वरित पाच दिवसात जर जनावरांना आजाराची लागण झाल्यास पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडूनच महागडी सेवा घ्यावी लागते. म्हणजेच पशुपालकांना आर्थिक भुर्दंड व मानसीक त्रास देण्यापलिकडे या विभागाने काहीच केले नसल्याची प्रचिती येते.दिघोरीला पशुवैद्यकीय दवाखान्याची स्वत:ची इमारत व्हावी यासाठी जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून जागा हस्तांतरीत करण्यात आली. मात्र या घटनेला जवळपास पाच वर्षाचा कालावधी लोटला असला तरी अजूनपावेतो दिघोरीत पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतीचे भूमिपूजन झालेले नाही.
शासनाकडून पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागा देण्यात आली. मात्र इमारत बांधकाम विभाग अयशस्वी ठरला. तसेच सध्या भाड्याच्या घरात असलेला दवाखाना आजही कायम असून येथे डॉक्टरांची नेमणूक नसल्याने संबंधित विभागाने दिघोरीतील पशुपालकांना व पशुंना वाऱ्यारच सोडले असले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पशुपालकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये. वेळेवर जनावरांवर उपचार व्हावे या उदात्त हेतूने शासनाने गावोगावी पशुदवाखान्यांची निर्मिती केली. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील पशुदवाखाना वाऱ्यावर सोडला आहे. पशुपालकांना वेळेवर व चांगली सेवा मिळविण्यासाठी ताबडतोब दिघोरीत कायमस्वरुपी डॉक्टर व कंपाउंडरची व्यवस्था करून देण्याची मागणी येथील पशुपालकांनी केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय, असा सवाल पशुपालकांनी केला आहे.

Web Title: Dighori Veterinary Clinic in the Wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.