जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:02+5:302021-07-15T04:25:02+5:30
भंडारा : जिल्ह्यातील अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये ...

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा
भंडारा : जिल्ह्यातील अर्भक मृत्युदर व बालमृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये अतिसार हे प्रमुख मृत्यूचे कारण आहे. १० टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. त्यामुळे बालमृत्यू टाळण्यासाठी १५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा पार पडली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुकी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर, आय.ए.पी.चे अध्यक्ष डाॅ. अशोक ब्राह्मणकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डाॅ. माधुरी माथूरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते याशिवाय महिला बालकल्याण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सर्व तालुका आरोग्यधिकारी, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी चंद्रमणी मेश्राम, जिल्हा समूह संघटक चंद्रकुमार बारई उपस्थित होते.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे उद्देश याबाबत माहिती देण्यात आली. यात पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड - १९ आजारांच्या प्रतिबंधक आणि व्यवस्थापनविषयक माहिती देण्यात आली.
बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्त होईल याची सुनिश्चिती करणे, जनजागृती करणे, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करायचा, गोळ्यांचे घरोघरी वाटप, आदींबाबतही माहिती देण्यात आली. पंधरवडाअंतर्गत मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.