पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
By Admin | Updated: August 31, 2014 23:35 IST2014-08-31T23:35:18+5:302014-08-31T23:35:18+5:30
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरच्या शाळामधील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी

पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
शिक्षक दिनाच्या दिवशी : विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक
राजू बांते - मोहाडी
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरच्या शाळामधील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी दूरदर्शन, इंटरनेट, रेडीओ आदी साधने उपलब्ध करून देण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत.
शिक्षणतज्ज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिवस म्हणून ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. शिक्षक दिनाच्या दिवशी एकाच वेळेस विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पहिलेच पंतप्रधान राहणार आहेत. दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षक दिनासंबंधी भाषण होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण टेलीव्हीजन, इंटरनेट, रेडीओ याद्वारे करण्यात येणार आहे. हे भाषण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेमध्ये राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी शाळेमधील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची काळजी मुख्याध्यापकांना घ्यायची आहे. शाळेमध्ये टी.व्ही. संच नसेल तर शाळा मख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचेकडे असणारा संच उसनवारी तत्वावर शाळेमध्ये कार्यक्रमाच्या वेळेत उपयोगात आणायचा आहे. जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये अधिक संच उपलब्ध करून द्यायचे आहे. राज्यात असणाऱ्या सर्व व्यवस्थापनांच्या १.०४ लक्ष शाळांपैकी किती शाळेत टि.व्ही. संच उपलब्ध आहेत याची माहिती द्यायची आहे. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण इंटरनेटद्वारे सुद्धा होणार आहे. ज्या शाळांमध्ये केंद्र शासनाची आयसीटी योजना राबविण्यात येते अशा शाळांमध्ये पुरविण्यात आलेल्या प्रोजेक्टर्सचा वापर कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या वेळी विद्युत पुरवठा सुरु राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना आहे. भारनियमन असल्यास शाळा व्यवस्थापन समितीला जनरेटरची व्यवस्था करायची आहे. सदर कार्यक्रम शाळास्तरावर पार पाडण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची राहणार आहे. विद्यार्थ्यांनी पंतप्रधानाचे भाषण ऐकल्यानंतर किती विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली याची माहिती मुख्याध्यापकाला गटशिक्षणाधिकाऱ्याकडे द्यायची आहे. या कार्यक्रमाचे संनियंत्रण शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण सहसंचालक व दोन शिक्षण उपसंचालक यांचा कृतीगट करणार आहे. दुर्गम भागात टीव्ही संचावरुन प्रसारण दिसण्यास अडचणी आल्यास अशा अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना रेडीओद्वारे प्रसारण ऐकविण्यात येण्याच्या सूचना आहे.