सहभागातून गावाचा विकास
By Admin | Updated: June 4, 2016 00:24 IST2016-06-04T00:24:02+5:302016-06-04T00:24:02+5:30
१४व्या वित्त आयोगांतर्गत आता ग्रामपंचायतीला निधी मिळणार आहे. आमचं गाव आमचा विकास या उपक्रमामध्ये ..

सहभागातून गावाचा विकास
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादन : ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाच्या लोगोचे प्रकाशन
भंडारा : १४व्या वित्त आयोगांतर्गत आता ग्रामपंचायतीला निधी मिळणार आहे. आमचं गाव आमचा विकास या उपक्रमामध्ये गावांना विकास आराखडा तयार करायचा आहे. यामध्ये संपूर्ण गावाचा सक्रीय व क्रियाशिल सहभाग मिळाला तरच गाव विकासाचे ध्येय साकार होवू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची भूमिका काय असावी. यासाठी विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, यशदाचे प्रमुख मार्गदर्शक के. एल. झलके, कुंदावार तसेच पंचायत राज ट्रेनिग सेंटरचे बनसोड उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, खाते प्रमुखांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत तयार करण्यात येणारे जिल्ह्याचे नियोजन गाव विकास आराखडयाशी जोडु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंचायत विभागामार्फत आमचं गाव आमचा विकास यासाठी तयार करण्यात आलेल्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलतांना राजेंद्र निंबाळकर म्हणाले, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणती कामे करायची याचे नियोजन ग्रामपंचायतींनाच करायचे आहे. शिक्षण, आरोग्य, उपजिविका, महिला व बालकांचा विकास तसेच दरडोई उत्पन्न वाढविण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. तर रस्ते, नाल्या यासारख्या बांधकामाच्या कामांना दुय्यम प्राधान्य राहणार आहे. यामध्ये विभाग प्रमुखांना त्यांच्या अंतर्गतची कामे गाव नियोजनात घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. १५ आॅगष्ट पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना विकास आराखडा तयार करायचा आहे. त्यासाठी पंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुध्दा घेण्यात येईल. यावेळी ग्रामपंचायत विकास आराखडयामध्ये निधीचा विनीयोग कसा करायचा याबाबत यशदाचे झलके यांनी मार्गदर्शन केले. कुंदावार यांनी लोकसभागी नियोजन प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आपला जिल्हा मानव निर्देशकांमध्ये वरच्या क्रमांकावर कसा जाईल, याचे नियोजन करुन काम करावे, असेही ते म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे, सुजाता गंधे, विजय उरकुडे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एस. सोनकुसरे, जिल्हा सैनिक अधिकारी दीपक लिमसे, कृषी विकास अधिकारी किरवे, कनिष्ठ अभियंता हटवार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
(नगर प्रतिनिधी)