ऐतिहासिक आंबागड किल्ल्याचा विकास कागदावरच
By Admin | Updated: December 5, 2015 00:42 IST2015-12-05T00:42:02+5:302015-12-05T00:42:02+5:30
तुमसर तालुक्यातील एकमेव ऐतिहासिक आंबागड किल्ला हा शासनाच्या दुर्लक्षितपणाचे शिकार ठरला आहे.

ऐतिहासिक आंबागड किल्ल्याचा विकास कागदावरच
पुरातत्त्व व पर्यटन विभागाची उदासीनता : तुमसर क्षेत्रातील ऐतिहासिक माहात्म्य
तुमसर : तुमसर तालुक्यातील एकमेव ऐतिहासिक आंबागड किल्ला हा शासनाच्या दुर्लक्षितपणाचे शिकार ठरला आहे. या किल्यापर्यंत जाण्याकरीता पक्का रस्ता नाही. केवळ शासनाने थातूरमातूर निधी देऊन दुर्लक्षित किल्ल्याकडे लक्ष देण्याचे ठरविल्याचे दिसते. पुरातत्व व पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी येथे येवून केवळ कागदोपत्री अहवाल शासनाला सादर करतात. प्रत्यक्षात येथे त्याचा प्रत्यय येत नाही.
भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाद्वारे गेल्या काही दशकात झालेल्या पुरातत्वीय अन्वेषण आणि उत्खननामुळे विदर्भातील एकुणच संस्कृतीच्या संदर्भात आजपर्यंत इतिहासाला ज्ञात नसलेल्या अनेक बाबी गेल्या काही दशकात स्पष्ट झाल्या आहेत. महापाषाण संस्कृतीबद्दल अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुरावे उपलब्ध झाले आहेत. या भागात मूळ कोणत्या लोकांची वस्ती होती, हा प्रश्न अजूनपर्यंत पूर्णपणे सुटलेला नाही. या भागात प्राचीन काळी नागा लोकांची वस्ती होती. त्यानंतर गवळी लोकांची वस्ती आणि लहान, लहान राज्ये असल्याचे पुरावे उपलब्ध होतात. युरोप प्रमाणे प्राचीन भारताचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. विदर्भाच्या इतिहासाविषयी तीच परिस्थिती आहे. नाणी, ताम्रपट, शिलालेख, वास्तूअवशेष, नाटके, पुराणे, दंतकथा, यावरून तुटक तुटक धागे वारंवार तपासून इतिहास तयार करावा लागतो. ज्ञात ऐतिहासिक राजवंशापैकी नंद, मौर्य, शुंग, मित्र, भद्र, सातवाहन, शक, वाकाटक, नलवंश्ीा, महिस्पती, कलचुरी, राष्ट्रकुट, परमार, चालुक्य यादव, गोंड, मुगल, भोसले इ. राज्यकर्त्यांनी या प्रदेशावर राज्य केल्याचे विविध ऐतिहासिक पुराव्यांवरून व उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून ही बाब स्पष्ट होते.
प्राचीन मंदिरे
हा एक मंदिरांचा समुच्चय असलेला डोंगर आहे. गडावरील प्राचीन मूर्ती या नुसत्या मूर्ती नसून त्या काळचे प्रतिनिधीक अंग आहेत. देवदेवतांच्या विषयी कोणत्या कल्पना होत्या याची माहिती मिळते. उत्तर भारतात गुप्त राजवटीत पुराणांची रचना झाली. त्यात दशअवतारांची कल्पना मांडण्यात आली. त्याचे प्रतिसाद या डोंगरावर उमटल्याचे दिसते. उत्तर भारतीय गुप्तकलेचा प्रभाव जाणवतो. इ.स.वी. सनाच्या चौथ्या शतकात उभारण्यात आलेल्या या वास्तू तत्कालीन मथुरा शैलीची साक्ष देतात. वराह मूर्ती वाकाटक शिल्पींची एक श्रेष्ठ कलाकृती आहे. ती बेसॉल्टच्या दगडात खोदलेली असून नितळ कोरव अवयवांद्वारे तीचे एैश्वर्य दिसून येते. नरसिंहाचे स्वरुप वाकाटकांच्या राज्यात खूपच लोकप्रिय दिसते. माडगी येथील वैनगंगेच्या (कण्हेवेण्णा) पात्रातील नरसिंह मूर्ती कदाचित त्याच काळातील असावी. केवलनरसिंह मंदिर येथे १५ ओळींचा प्रभावती गुप्तचा प्रशस्तीलेख आहे. गुप्तराम, त्रिविक्रम (वामन) मंदिर, भोगराम इत्यादी प्राचीन मंदिर आहेत.
बख्त बुलंद शहा
एकंदरीत गोंड राजांचा विचार केल्यास बख्तबुलंद सारखा दुसरा प्रभावी गोंडराजा नसल्याचे स्पष्ट होते. बख्तबुलंद धडाडीचा योद्धा होता. तथापि परिस्थितीने त्याला साथ दिली नाही. युद्धग्रस्त व अर्थपिडीत राज्याचा त्याला वारसा मिळाला होता. परंतु एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्याने जे निर्णय घेतले, त्याला गोंड राजवटीत तोड नाही. मिळालेल्या अल्पशा अवधीत त्याने भरपूर राज्यविस्तार करून छिंदवाडा, बैतूल, नागपूर, शिवणी, भंडारा आणि बालाघाटचा परिसर आपल्या राज्यात समाविष्ठ केला. अनेक प्रशासकीय व महसूल विषयक सुधारणा अमलात आणल्या. यासाठी त्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची संबंधित पदावर नियुक्ती केली. नागपूर शहराचा विस्तार करुन त्याला राजधानीचा दर्जा दिला व तेथूनच तो कारभार करू लागला. बख्तबुलंदने शिवणी येथील गव्हर्नर राजखान पठाण यांच्याकडून आंबागड किल्ला १७०० मध्ये बांधून घेतला. आंबागड प्रदेश झाडीमंडल म्हणून ओळखल्या जात असे. या भागात घनदाट जंगल होते. वेगवेगळ्या प्रदशातून कुशल कारागीर आणून कृषी, उद्योग व व्यापार यांचा पाया घातला. या भागाचा विशेषत्वाने विकास करण्याचे प्राथमिक क्षेत्र बख्तबुलंद यास द्यावे लागते. सानगडी, प्रतापगड, किल्ले त्याच्या राज्यात मोडत होते. बख्तबुलंद नंतर चांदसुलतानने इ.स. १७३८ पर्यंत राज्य केले. चांदपूर देवस्थान हे गाव त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. तिथे पूर्वी किल्ला असल्याचे ऐकीवात आहे. चांदसुलतानच्या मृत्यूनंतर गोंड वारस युद्धाचा फायदा घेवून रघुजी भोसलेंनी इ.स. १७३६ मध्ये पाटणसावंगी, पवनी, सोनबरडी आदी गोंडाची ठिकाणे सर करून आंबागड, देवगड, सानगडी, प्रतापगड, नागपूर ही गोंड राज्ये ताब्यात घेतली. रघुजी भोसलेल्या अधिपत्त्याखाली कुणबी व पोवार या समाजाने सैनिकी पेशा स्वीकारला व भोसले बरोबर कंटकच्या मोहीमेत भाग घेतला. त्याबद्दल भोसलेंनी वैनगंगा खोऱ्यातील सुपीक जमीन इनाम म्हणून देऊन त्यांचा गौरव केला.
आंबागड किल्ला
इतिहासाची साक्ष देणारा आंबागड किल्ला सातपुडा पर्वतरांगेत मोडत असून या भागातील लष्करी महत्व लक्षात घेऊन बख्तबुलंदने शिवणी येथील गव्हर्नर राजाखान पठाण यांच्या हस्ते इ.स. १७०० मध्ये बांधून घेतला. किल्ला मूळ स्वरपात नसला तरी अवशेष स्वरुपात शिल्लक आहे. आंबागड किल्ल्याच्या इतिहासाची साधने फारसी उपलब्ध नाहीत. तसेच त्याचा अधिकृत असा इतिहास उपलब्ध नाही.
किल्ल्याची उत्तर दक्षिण दिशा सुरक्षित असून पूर्व पश्चिमेकडे तटबंदी केलेली आहे. किल्ल्याच्या बांधणीसाठी वालुकाश्म दगडाचा व विटांचा वापर करण्यात आला. हा किल्ला दोन भागात विभागलेला असून पूर्वी किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर गोंडी राजचिन्ह होते.
पांडे महाल भंडारा येथे महालाकरिता वापरलेला दरवाजा आंबागड किल्ल्याचा आहे. येथे अनेक बुरूज असून प्रत्येक बुरूजावर एक तोफ ठेवण्याची सोय आहे. भोसले काळात तुरुंग म्हणून या किल्ल्याचा वापर होत असे. ब्रिटीश काळापर्यंत आंबागड हा स्वतंत्र परगणा असून प्रशासकीय केंद्र होते. (तालुका प्रतिनिधी)