Determined for the development of farmers, unemployed | शेतकरी, बेरोजगारांच्या विकासासाठी कटिबद्ध
शेतकरी, बेरोजगारांच्या विकासासाठी कटिबद्ध

ठळक मुद्देनाना पटोले : साकोली मतदारसंघातील पालांदूर परिसरात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजप सरकारने शेतकरी हिताचे पाच वर्षात कोणतीही निर्णय घेतले नाही. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. आमची सत्ता आल्यास उद्योग उभारुन शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांच्या विकासासाठी आपण कटीबध्द आहोत, असे प्रतिपादन साकोली मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांनी केले.
लाखनी तालुक्यातील पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्रातील खराशी, लोहारा, नरव्हा, पाथरी, मऱ्हेगाव, वाकल, किटाडी, सायगाव, गोंदी/ देवरी आदी ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. शफी लद्दानी, जिल्हा परिषद सदस्य रामटेके, खुशाल गिदमारे, बिंदु कोचे, दामाजी खंडाईत, रवींद्र घाटबांधे, विजय कापसे, होमराज कापसे, योगेश झलके, कैलाश घाटबांधे आदी उपस्थित होते.
धानाला तीन हजार रुपये भाव आणि ५०० रुपये बोनस देण्याची ग्वाही देत नाना पटोले म्हणाले, गोसेखुर्दच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी विस्तृत केल्या जाणार, राज्यात दोन लाख ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार, ज्यांना नोकऱ्या नाही अशा सुशिक्षितांना पाच हजार रुपये मानधन देण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना दरमहा दीड हजार रुपये मानधनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य आहे, ते शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने करण्यास मी तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनतेला महागाईच्या घाईत ढकलणाऱ्या जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप सरकारला विधानसभा निवडणुकीत बाहेरचा रस्ता दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालांदूर परिसरातील मतदारांचे आशीर्वाद घेवून हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

Web Title: Determined for the development of farmers, unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.