देव्हाडा व ढिवरवाडा घाटातील रेती चोरीप्रकरणी जबाबदारी निश्चित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:35+5:302021-04-07T04:36:35+5:30
करडी (पालोरा):- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज व ढिवरवाडा येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटाचे लिलाव झाले नसतानाही मोठया प्रमाणात ...

देव्हाडा व ढिवरवाडा घाटातील रेती चोरीप्रकरणी जबाबदारी निश्चित करा
करडी (पालोरा):- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज व ढिवरवाडा येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटाचे लिलाव झाले नसतानाही मोठया प्रमाणात अवैद्य रेती उत्खनन करुन रेतीची चोरी होत आहे. परिसरात महसूल विभागाचे तलाठी कार्यालय व पोलीस चौकी असूनही रेतीची तस्करी का होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून चोरी झालेल्या रेतीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप करुन संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
वास्तविक पाहता देव्हाडा बुज. येथे महसुल विभागाचे तलाठी कार्यालय तसेच करडी पोलीसांची चौकी आहे. चौकीत नेहमी पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात असतात. त्यांच्या वेतनासाठी जनतेचा पैसा खर्च केला जातो आहे. परंतू असे असूनही मोठया प्रमाणावर जमीन खरडून रेतीची तस्करी केली जात आहे. नदी पात्रात खोल पाट पडल्याने भूजलपातळी खालावली आहे. जर वैविध्यत संपुष्टात येण्याच्या धोका निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होवून शासनाचा महसूल बुडाला आहे. यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ढिवरवाडा रेती घाटावर सुद्धा रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे.
मोठया प्रमाणात रेती चोरी करुन शासनाचा महसूल बुडविला जात आहे. परिसरात रेतीचे साठे आहेत. प्रकरणी चोरी झालेल्या रेतीचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन मोजमाप करून संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
'त्या' तक्रारीवर अजुनही कार्यवाही नाही
देव्हाडा बुज येथील वैनगंगा नदीतून डिसेंबर पासून सतत अवैध उत्खनन करून रेती उपसा केला जातो आहे. देव्हाडा बुज येथील वैनगंगा नदीतील रेती घाटाचे लिलाव झालेले नाही, असे असतानाही सदर ठिकाणची रेती मोठ्या प्रमाणावर चोरी गेलेली आहे? व जातही आहे, असे निवेदन देव्हाडा ग्रामपंचायतीचे सदस्य किशोर रामा रंगारी व माजी ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन बोदरे यांनी आ. राजू कारेमोरे यांचेसह महसूल विभागाचे उपविभागिय अधिकारी तुमसर, तहसिलदार मोहाडी यांना दिले होते. त्या निवेदनाची गंभीर दखल आ. राजू कारेमोरे यांनी घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी पत्र दिले होते. परंतू जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अजूनही कार्यवाही झालेली नाही.