आंगणवाडी सेविकांचा ‘डेप्युटी सीईओं’ना घेराव
By Admin | Updated: July 31, 2016 00:16 IST2016-07-31T00:16:09+5:302016-07-31T00:16:09+5:30
महिला व बालविकास कार्यालयाने अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी केलेले कपाट निकृष्ट दर्जाचे आहे.

आंगणवाडी सेविकांचा ‘डेप्युटी सीईओं’ना घेराव
कपाट खरेदी व थकीत मानधन प्रकरण : चौकशी समिती नेमली, अहवालानंतर कारवाईचे दिले आश्वासन
भंडारा : महिला व बालविकास कार्यालयाने अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी केलेले कपाट निकृष्ट दर्जाचे आहे. यात मोठ्या प्रमाणात अपहार केला असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन मिळत नाही. या प्रमुख मागण्यांना घेऊन आज शनिवारला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) पी. डी. राठोड यांना पाच तास घेराव घालून धारेवर धरले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३०० अंगणवाड्यांमधून अंगणवाडी सेविका व मदतनीस बालकांना घडवित आहेत. मात्र, शासनाकडून त्यांना नियमित मानधन देण्यात येत नाही. त्यातच या महिन्यात महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील ८९९ अंगणवाडी केंद्रांसाठी लोखंडी कपाट खरेदी केले. व ते परस्पर सर्व अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केला. कपाटाची कुठलिही कल्पना सेविका व मदतनीस यांना नव्हती. सदर कपाट निकृष्ठ दर्जाच्या लोखंडी पत्र्याने तयार करण्यात आलेली आहे. सदर कपाट अंगणवाडी सेविकांनी खरेदी केल्याचे लिहून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला होता. त्यामुळे हे कपाट भंगारावस्थेतील साहित्याने बनविल्याने त्यावर करण्यात आलेला लाखोंचा पैसा काही दिवसातच व्यर्थ जाणार आहे. परंतु कपाट खरेदी करताना अधिकाऱ्यांनी अपहार केला. मात्र त्याचे खापर सेविकांवर फोडण्याचा प्रकार भविष्यात झाला असता. त्यामुळे सेविकांमध्ये अधिकाऱ्यांच्या विरूध्द असंतोष पसरला आहे.
कपाट बघितल्यावर त्याची किंमत दोन हजाराच्यावर नसतानाही सदर विभागाने त्यासाठी पाच हजार रूपये मोजल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी लावून धरली. याबाबत त्यांनी शनिवारला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) चे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे व जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सविता लुटे, अल्का बोरकर, मंगला गजभिये, लहाना राजूरकर, रिता लोखंडे, सुनंदा चौधरी, सुषमा जांभुळकर, छाया क्षिरसागर, ललीता खंडाईत, छाया गजभिये आदींनी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग राठोड यांना त्यांच्याच कक्षात घेराव घातला. यावेळी राठोड यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने महिलांनी रूद्रावतार दाखवित त्यांना या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पाच तास हा घेराव घालण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
चौकशी समिती नेमली
प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून ही कपाट खरेदी करून त्याता अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती नेमली व त्याचा अहवाल आठवडाभरात येईल. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी संतप्त महिलांच्या शिष्टमंडळाला राठोड यांनी दिले. यानंतर सुमारे पाच तासानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
संतप्त अंगणवाडी कर्मचारी कपाट खरेदी प्रकरणात जिल्हा परिषदमध्ये धडकणार असून कुठलातरी अनुचित प्रकार त्यांच्याकडून घडेल अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे भंडारा पोलिसांच्या महिला व पुरूष कर्मचाऱ्यांचे एक पथक तातडीने जिल्हा परिषदेत दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेत प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशद्वारावर व अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अशा आहेत मागण्या
कपाट खरेदी प्रकरणात कारवाई, थकित मानधन त्वरीत देणे, भंडारा प्रकल्पातील सन २००९ पासूनचे केंद्र व राज्य सरकारचे थकित मानधन देण्यात यावे, २०१३ पासूनचा थकित प्रवासभत्ता त्वरीत देण्यात यावा, प्रत्येक अंगणवाडी केंद्रात बचत गटामार्फत आहार शिजवण्यात यावे, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना सेवासमाप्ती लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे.