सहा महिन्यांपासून श्रावणबाळ योजनेच्या अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:34+5:302021-02-23T04:53:34+5:30
लाखांदूर : शासनाच्या श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजनेंतर्गत गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून अनु. जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान न दिल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांत ...

सहा महिन्यांपासून श्रावणबाळ योजनेच्या अनुदानापासून वंचित
लाखांदूर : शासनाच्या श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजनेंतर्गत गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून अनु. जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान न दिल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हे अनुदान शासनाने उपलब्ध न केल्याने तालुक्यातील जवळपास दोन हजार वृद्ध लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित ठरले असल्याची बोंब आहे.
शासनाच्या श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे तालुक्यात सर्वच प्रवर्गातील पात्र हजारो वृद्ध लाभार्थी नागरिक आहेत. या लाभार्थ्यांना शासनाच्या या योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये अनुदान उपलब्ध केले जात आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून या योजनेंतर्गत अनु. जाती प्रवर्गातील लाभार्थी वगळता अन्य प्रवर्गातील लाभार्थ्यांना नियमित अनुदान उपलब्ध केले जात असताना अनु. जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचे काय? असा सवाल लाभार्थ्यांत केला जात आहे. यंदा पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याने सर्वत्रच आर्थिक संकट असल्याचे बोलले जात आहे. या परिस्थितीत शासनाच्या दरमहा उपलब्ध होणाऱ्या एक हजार रुपये अनुदानावर वृद्धापकाळात जीवन व्यतीत करणाऱ्या वृद्ध लाभार्थ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळून उपासमारीची भीती व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन श्रावणबाळ योजनेच्या वृद्ध लाभार्थ्यांचे गत सहा महिन्यांपासून रखडलेले अनुदान उपलब्ध करण्यासह नियमित उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी पीडित लाभार्थ्यांनी केली आहे.