सोमलवाडा येथे अतिक्रमण निर्मूलनात उदासीनता
By Admin | Updated: February 12, 2015 00:39 IST2015-02-12T00:39:42+5:302015-02-12T00:39:42+5:30
सोमलवाडा रस्त्यावरील बाजार ओळीमधील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बजावले आहे.

सोमलवाडा येथे अतिक्रमण निर्मूलनात उदासीनता
लाखनी : सोमलवाडा रस्त्यावरील बाजार ओळीमधील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटीस बजावले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यातून लाखनीवासीयांना स्थानीक सरपंच बाहेर काढणार की केवळ नोटीसचे लॉलिपाप दाखवून मुग गिळून गप्प बसणार याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत बाजारामधून सोमलवाडा रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक वर्षापासून अतिक्रमण आहे. त्यामुळे वाहतुक व रहदारासाठी अडचण निर्माण होत असते. सोमलवाडा, रेंगेपार (कोठा), गोंडसावरी, सावरी, दैतमांगली, खेटेपार, चंद्रपूर (कोका), करडी आदी अनेक गावांना लाखनीसोबत जोडणारा मार्ग असून या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सुरू असलेली बससेवा मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीद्वारे तीनवेळा नोटीस बजाविण्यात आली आहे.ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना 'मॅनेज' करून अतिक्रमणाच्या जागेवर इमारती उभ्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाने या रस्त्याच्या मध्यभागातून २० फूट अंतरावर सिमेंट नालीचे बांधकामास मंजुरी दिली आहे. रस्त्यावरील व्यावसायिक रस्त्याच्या मध्य भागापासून २० फूट जागा प्रशासनाला अतिक्रमणातून मोकळी करून देण्यास तयार आहेत. २६ जानेवारी २०१५ च्या ग्रामसभेत सर्वानुमते अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भात ठराव घेण्यात आला आहे, असे असतानाही ग्रामपंचायतचे पदाधिकारी अतिक्रमण हटविण्याबाबतची ठोस भूमिका घेतानी दिसत नाही. यामुळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी 'मॅनेज' झाल्याची चर्चा आहे. रस्त्यावर अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. पार्किंगची व्यवस्था नाही. रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास व्यापाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)