शिक्षण विभाग वाऱ्यावर
By Admin | Updated: June 6, 2016 00:28 IST2016-06-06T00:28:13+5:302016-06-06T00:28:13+5:30
शिक्षण विभागाची धुरा ज्यांच्या खाद्यांवर आहे, अशा विभागाच्या दोन्ही स्तरावरील सेनापतींची पदे रिक्त आहेत.

शिक्षण विभाग वाऱ्यावर
रिक्त पदांचा भार प्रभाऱ्यांवर : शिक्षणाधिकारी, अधीक्षकांची पदे रिक्त
इंद्रपाल कटकवार भंडारा
शिक्षण विभागाची धुरा ज्यांच्या खाद्यांवर आहे, अशा विभागाच्या दोन्ही स्तरावरील सेनापतींची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागांतर्गत शिक्षणाधिकारी,, उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक यांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे आधीच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वाणवा असताना त्यात रिक्त पदांची संख्या वाढल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती शिक्षण विभागाची झाली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. माध्यमिक विाभागात ३१ मे पर्यंत शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे कार्यरत होते. त्यांची बदली वर्धा येथे झाली. याच विभागात दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे आहेत. ही दोन्ही पदे भरली असली तरी कामाच्या ओझ्यामुळे अधिकारी तणावग्रस्त आहेत. अधीक्षकांचे पद मागील कित्येक महिन्यांपासून रिक्त आहे.
प्राथमिक शिक्षण विभागात एक शिक्षणाधिकारी व तीन उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे आहेत. यापैकी फक्त एकच उपशिक्षणाकिरी कर्तव्यावर आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांसह दोन उपशिक्षणाधिकारी व अधीक्षकांचे पद रिक्त आहेत.
यातही वेगळी बाब म्हणजे उपशिक्षणाधिकारी पडोळे हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने प्राथमिक विभागाचा डौलारा फक्त कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर राहणार आहे. पडोळे यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी पद भरणे अगत्याचे आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे पद मागील आठ महिन्यांपासून रिक्त आहे. उपशिक्षणाधिकारी पदावर नियुक्त केलेले अधिकारीही प्रभारी होते. जून महिन्याच्या २७ तारखेला शाळेचा पहिला ठोका वाजणार आहे. त्यात रिक्त पदांमुळे कामाची गती निश्चितच मंदावणार आहे.
निरंतर शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी मडावी हे आधी प्राथमिक विभागात होते. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती तिथे का करण्यात आली हा भाग समजण्यापलीकडे असला तरी त्यांच्या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची वर्णी लागलेली नाही.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या पद भरतीबाबत विभागीय स्तरावर पत्र व्यवहार करण्यात आला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी रिक्त पदे भरण्यात येणार आहे. लवकरच निर्णय कळविण्यात येईल..
- अनिल पारधी
शिक्षण उपसंचालक, नागपूर